नागपूर : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तोतलाडोह, पेंच खैरी प्रकल्प आणि खिंडसी तलाव पुन्हा ओव्हर फ्लो झाले आहे. तोतलाडोह प्रकल्पाचे सर्व १४ गेट १ मीटरने, पेंच खैरीचे १४ गेट १ मीटर, तर दोन गेट १.५ मीटरने बुधवारी दुपारी उघडण्यात आले. याशिवाय खिंडसी तलावाच्या संलागवरून ४ इंचाहून अधिक पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे पेंच नदी काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
रामटेक तालुक्यात गत २४ तासांत २५ मि.मी. पावसाची नोंद झाली. यंदाच्या हंगामात तालुक्यात बुधवारपर्यंत १५३५ मि.मी. (१४० टक्के) पावसाची नोंद झाली आहे.
सध्या तोतलाडोह प्रकल्पात ९९ टक्के जलसाठा आहे. तोतलाडोहचे पाणलोट क्षेत्रात दोन झालेला दमदार पाऊस, तसेच मध्य प्रदेशातील चौराई धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने तोतलाडोहचे १४ गेट उघडण्यात आल्याची माहिती पेंच, पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता राजू भोमले यांनी दिली. तसेच नवेगाव खैरीचे १४ गेट १ मीटर, तर दोन गेट १.५ मीटरने बुधवारी दुपारी उघडण्यात आल्याची माहिती नवेगाव खैरी प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता विशाल दुपारे यांनी दिली. नवेगाव खैरी प्रकल्पातून सध्या १७४६ कुमेक इतका पाण्याचा विसर्ग होत आहे.
खिंडसी तलाव १०० टक्के भरलेला असून, त्याचा नैसर्गिक ओव्हर फ्लो ४ इंचापेक्षा जास्त उंचीने वाहत आहे, अशी माहिती कनिष्ठ अभियंता मयूर भाटी यांनी दिली.