लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस दलात राहून गुणवत्तापूर्ण सेवा दिल्याबद्दल शहर पोलीस दलातील दोघांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणारे मानाचे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले. मिलिंद सुधाकर तोतरे आणि बट्टूलाल रामलोटन पांडे अशी त्यांची नावे आहेत.पोलीस दलात राहून खडतर, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा देणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना दरवर्षी विविध पदकाने सन्मानित केले जाते. आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून विविध पदकांची घोषणा झाली. त्यात शहर पोलीस दलातील तोतरे आणि पांडे यांचाही समावेश आहे.तोतरे सध्या एक टप्पा पदोन्नतीवर एसीबीत कार्यरत आहेत. १५ जून १९८९ ला ते थेट उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले होते. गुन्हे शाखेसह शहरातील विविध पोलीस ठाण्यात त्यांनी काम केले आहे. केंद्रीय गुप्तवार्ता विभागात सहायक सूचना अधिकारी, ब्युरो ऑफ इमिग्रेशन, अमृतसर (पंजाब) येथे प्रतिनियुक्तीवर काम करताना त्यांनी भारत-पाकिस्तान सीमेवरील अटारी चेकपोस्टवरही सेवा दिली. शहर पोलीस दलात परतल्यानंतर त्यांनी महापालिकेचा क्रीडा साहित्य घोटाळा, टँकर घोटाळा, पिंटू शिर्के हत्याकांड, ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांचा क्लीष्ट तपासही केला. त्यानंतर त्यांची एटीएसमध्ये बदली झाली. येथे त्यांनी नागपूरसह बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यातील समाजकंटकांवरही नजर ठेवून उपद्रवी मंडळींना प्रतिबंध करण्याची कामगिरी बजावली. सध्या ते एसीबीत कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत विविध विभागातील भ्रष्ट मंडळींविरुद्ध सापळे लावण्यासोबतच बहुचर्चित सिंचन घोटाळ्याचाही तपास केला आहे.बट्टूलाल पांडे सध्या गुन्हे शाखेत एएसआय (सहायक पोलीस उपनिरीक्षक) म्हणून कार्यरत आहेत. १ डिसेंबर १९८८ ला पोलीस दलात रुजू झालेल्या पांडे यांनी आपल्या २२ वर्षांच्या सेवेत अनेक कारवाईत सहभाग नोंदवला. हत्या, अपहरण, दरोडा, लुटमारीसारख्या अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात आणि अनेक कुख्यात गुन्हेगारांना शोधून काढण्यात पांडे यांनी महत्त्वाची भूमिका वठविली आहे. कुख्यात गुंड राजा गौसने ठिकठिकाणी फायरिंग करून खळबळ उडवून दिली असता पांडे आणि सहकाऱ्यांनी त्याला नंदनवनच्या जगनाडे चौकात पकडताना घडलेला थरार पोलीस दलात चर्चेचा विषय ठरला होता.
नागपूरचे तोतरे, पांडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 8:31 PM
पोलीस दलात राहून गुणवत्तापूर्ण सेवा दिल्याबद्दल शहर पोलीस दलातील दोघांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणारे मानाचे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले. मिलिंद सुधाकर तोतरे आणि बट्टूलाल रामलोटन पांडे अशी त्यांची नावे आहेत.
ठळक मुद्देएसीबी, गुन्हे शाखेला मान : पोलीस दलाकडून कौतुक