संजय रानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्य शनिवारी पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. अनलाॅक झाल्यानंतर पर्यटकांना बऱ्याच दिवसांपासून याची प्रतीक्षा हाेती. पर्यटन सिझनच्या अंतिम टप्प्यात परवानगी मिळाली असली तरी वन्य पर्यटनावर अवलंबून असलेल्यांना दिलासा मिळाला आहे. बाेर व्याघ्र प्रकल्प मात्र बंदच राहणार आहे.
पेंचचे प्रकल्प संचालक व मुख्य वनसंरक्षक डाॅ. रविकिरण गाेवेकर यांनी, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या निर्देशानुसार पर्यटन सुरू करण्यात आले असून नियमांचे पालन करून पर्यटनासाठी सज्ज असल्याची ग्वाही दिली. पेंच ३० जूनपर्यंत सुरू राहणार आहे तर नागलवाडी, पवनी व कऱ्हांडला बफर एरियाचे पर्यटन १ जुलैनंतरही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अतिवृष्टी झाली तरच ते बंद करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या काळात काही ठराविक रूटवरच पर्यटनाला परवानगी राहणार असून संबंधित गेटवरून केवळ ५० टक्के वाहनांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. नागपूर जिल्ह्याच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून निर्धारीत केलेल्या नियमांचा विचार करून सफारीच्या वेळा पुन:स्थापित केल्या जाणार असल्याचे डाॅ. गाेवेकर यांनी सांगितले. सिल्लारी गेट बुधवार ३० जूनलाही सुरू राहिल तर खुर्सापार गेट गुरुवारी २९ जूनला सुरू राहणार आहे.
पेंच प्रकल्प परिसरातील रिसाॅर्ट संचालक संदीप सिंग यांनी, पर्यटन सुरू करण्यास उशीर झाला असला तरी निर्णय दिलासादायक असल्याची भावना व्यक्त केली. मात्र पर्यटनाचा काळ अत्यल्प असल्याने जिप्सी चालक व मार्गदर्शकांना तीन राेटेशनचे कामही मिळणार नाही. आर्थिक ब्रेकडाऊन लक्षात घेता पावसाळ्यातही विशिष्ट रूट सुरू राहणार आहेत. वन्यजीव पर्यटनावर अवलंबून असलेल्यांना यामुळे दिलासा मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
नॅटएज्यू वेलफेअर फाऊंडेशनचे डाॅ. उमेश कृष्णा यांनी काेराेना महामारीच्या काळात व्याघ्र प्रकल्पाचे पर्यटन सुरू करण्याचा वनविभागाच्या निर्णयाचे स्वागत केले. यामुळे आदिवासी व स्थानिकांना राेजगाराची संधी मिळेल. आठवड्यापूर्वी निर्णय झाला असता तर आणखी लाभदायक ठरले असते, ही भावनाही त्यांनी व्यक्त केली. मात्र सफारीच्या वेळा अनुचित असल्याचे सांगत वन विभागाने पर्यटन आणखी १५ दिवस वाढविण्यात यावे, अशी मागणी केली.
- पाऊस आणि रस्ते खराब असल्याने बाेर व्याघ्र प्रकल्प मात्र बंद राहील.
- सफारीच्या वेळा : सकाळी ६ ते ९.३० वाजता आणि दुपारी १ ते ४ वाजतापर्यंत.
- सफरी ऑफलाईन बुकिंग हाेईल.
- गाईड, चालक व पर्यटकांना काेराेना प्रतिबंध नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.
- ओपन जिप्सीमध्ये चालक, गाईडसह ६ पर्यटकांना परवानगी असेल.