निशांत वानखेडे, नागपूर
नागपूर : जंगल सफारीची प्रतीक्षा करणाऱ्या पर्यटकांसाठी वनविभागाकडून आनंदाची बातमी मिळाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाेबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासह नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प, बाेर व्याघ्र प्रकल्प व उमरेड कऱ्हांडला अभयारण्याचे पर्यटनही १ ऑक्टाेबरपासून पर्यटकांसाठी खुले हाेणार आहे.
पावसाळ्यात या सर्व अभयारण्यातील जंगल सफारी बंद झाली हाेती. पावसाळा अजुन संपलेला नसून ५ ऑक्टाेबरपासून महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू हाेणार आहे. मात्र पावसाचा जाेर ओसरला असल्याने जंगलाची सफारीकरीता अनुकूल परिस्थिती पाहून काही गेटवरून पर्यटन सुरू करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सफारीकरीता पेंच व्याघ्र प्रकल्पात रस्त्याची परिस्थिती लक्षात घेता सद्यस्थितीत प्रकल्पातील सिल्लारी गेट, खुर्सापार गेट, बनेरा गेट व चोरबाहुली गेटवरून सफारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. बाेर व्याघ्र प्रकल्पात बाेर धरण पर्यटन गेटपासून २० किलाेमीटरपर्यंत रस्ते सफारीकरीता उपलब्ध राहणार आहेत. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील कऱ्हांडला पर्यटन झाेन, पवनी पर्यटन झाेन व गाेठनगाव पर्यटन झाेनअंतर्गत १५ किमी व २० किमी रस्ते सफारीकरीता अनुकूल नाहीत.
दरम्यान सध्या १ ते १५ ऑक्टाेबरपर्यंत सफारीची बुकिंग ऑफलाईन राहणार आहे. पर्यटकांसाठी ऑफलाईन पद्धतीने गेटवरील वाहन क्षमतेच्या मर्यादेत सफारी सुविधा उपलब्ध राहणार आहे. १६ ऑक्टाेबरपासून महाईकाेटूरिझमच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध हाेणार असल्याचे वनविभागाने सांगितले आहे.