नागपूर : उमरेड-पवनी-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यातील माय-लेकरं सध्या वन पर्यटकांना आणि वन्यजीवप्रेमींनी आकर्षित करीत आहेत. ही माय-लेकरं दुसरी कोणीही नसून वाघिण फेअरी आणि तिचे चार बछडे आहेत. रूबाबदार फेअरी आणि तिच्या मागोमाग जंगल, पाणवठ्यावरून बिनधास्त फिरणारे हे राजबिंडे बछडे म्हणजे पर्यटकांचे खास आकर्षण आहेत. वन्यजीव छायाचित्रकार आणि ‘लोकमत’चे नियमित वाचक अजय कथारिया यांनी अलिकडेच या अभयारण्याला दिलेल्या भेटीदरम्यान पाणवठ्यावर फेयरी आणि तिच्या चार पिल्लांचा एक विलोभनीय क्षण कॅमेऱ्यात टिपला.
वेकोलि मुख्यालयात काम करणारे कथरिया हा रोमांचकारी क्षण आठवून म्हणाले, आईसोबत स्वच्छंदपणे फिरणाऱ्या या बछड्यांचे फोटो काढण्याचा अनुभव फारच विलक्षण होता. वाघांच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी वनविभागाच्या प्रयत्नांना खरोखरच चांगले फळ मिळत आहे, अशी त्यांची प्रतिक्रिया होती.