संजय रानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेंच प्रकल्पात घडलेल्या एका गंभीर घटनेत दोन जिप्सीमधील पर्यटक सफारीदरम्यान बचावले. त्यांच्या वाहनांचे टायर शिकारी टोळ्यांनी बसविलेल्या थेट विद्युत तारांच्या सापळ्याच्या संपर्कात आले. नागलवाडी रेंज फॉरेस्टमध्ये १७ नोव्हेंबरला ही घटना घडली. या गंभीर दुर्घटनेमध्ये पर्यटक बचावले असले तरी या घटनेने पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेला मुख्य वनसंरक्षक व पेंच व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्ररक्षक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी पुष्टी दिली. ते म्हणाले, ही घटना खरी आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, तपासासाठी मी दोन सदस्यांची स्वतंत्र समिती गठित केल्याची माहिती त्यांनी दिली. या दोन सदस्यांच्या समितीमध्ये नितीन देसाई हे वन्य प्राण्यांच्या विद्युतरोधक प्रतिबंधक समितीचे सदस्य आणि निवृत्त विभागीय वन अधिकारी गिरीश वशिष्ठ यांचा समावेश आहे. १७ नोव्हेंबरला नागलवाडीत घडलेल्या घटनेसोबतच अलीकडच्या काळात घडलेल्या अशा अन्य घटनांची माहिती ही समिती घेणार आहे. मागील तीन वर्षांत नागलवाडी व आसपासच्या भागात घडलेल्या घटनांचा तसेच स्थानिक वनविभाग आणि महावितरणने केलेल्या कारवाईचा आढावासुद्धा ही समिती घेईल, तसेच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना सुचवेल. १ डिसेंबरपर्यंत समिती आपला अहवाल सादर करणार आहे.
दरम्यान, पेंच व्याघ्र प्रकल्पाने शिकार करण्याच्या संभाव्य प्रयत्नांना आळा घालण्यासाठी सापळे लावून आणि विजेचा प्रवाह सोडून शिकार करणाऱ्या टोळ्यांविरूद्ध मोहीम सुरू केली आहे.