लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विषावरील संशोधनाला वाव मिळण्यासाठी व वैद्यकीय विद्यार्थ्यांना विषारी झाडांची माहिती होण्यासाठी प्रत्येक न्यायवैद्यकशास्त्र विभागात ‘टॉक्सीकोलॉजिकल’ उद्यान असणे आवश्यक आहे. मात्र, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयोत) असलेल्या या उद्यानाला अवकळा आली आहे, याची दखल संबंधित विभागाने घेतल्याने आता पुन्हा विषारी झाडांचे उद्यान बहरणार आहे.मेयोच्या सुवर्ण महोत्सवाच्यानिमित्ताने न्यायवैद्यकशास्त्र विभागात झालेला बदल लक्ष वेधून घेत आहे. या विभागाची जबाबदारी डॉ. मकरंद व्यवहारे यांच्याकडे येताच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने आवश्यक बांधकाम करून घेत २२ वर्षांपासून उघड्यावर होणारे शवविच्छेदन बंद केले. विभागात आवश्यक सोयी उपलब्ध झाल्याने सध्या या विभागाच्या नव्या रूपाची चर्चा होत आहे. यात भर म्हणून ‘टॉक्सीकोलॉजिकल गार्डन’ची उभारणी हाती घेण्यात आली आहे. डॉ. व्यवहारे म्हणाले, ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’च्या (एमसीआय) निकषानुसार ५० वर्षांपूर्वी मेयोमध्ये हे उद्यान तयार करण्यात आले. या उद्यानात विषारी झाडांच्या मदतीने विषांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जात होती.काही विद्यार्थ्यांनी या विषयावर संशोधनही केले. दरम्यानच्या काळात इंटरनेट व इतर सोयी उपलब्ध झाल्याने या उद्यानाला अवकळा आली. परंतु प्रत्यक्ष विषाचे झाड, त्याची पाने, फुले, फळे पाहिल्यावर ते चांगल्या पद्धतीने समजते. विषाची तीव्रता व शरीरावर होणारा परिणाम याचा अभ्यास करणे आणखी सोपे जाते. यामुळे या उद्यानाच्या नूतनीकरणाच्या कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. विषाची झाडे असल्याने त्यांच्या सुरक्षेला घेऊन विशेष व्यवस्था केली जाणार आहे.
दहा लाखातून उभारणार उद्यानदहा लाख रुपये खर्चून ‘टॉक्सीकोलॉजिकल गार्डन’चे नूतनीकरण होणार आहे. पहिल्या टप्प्यात साधारण ३० झाडे लावण्यात येईल. याशिवाय त्याच्या बाजूला लॉन व शोभिवंत झाडेही लावली जाणार आहेत.-डॉ. मकरंद व्यवहारेविभागप्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र विभाग, मेयो