लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : तणसीच्या ढिगाऱ्याने पेट घेतला आणि तणसीसाेबतच जवळच उभा असलेला ट्रॅक्टर व ट्राॅली जळाली. यात शेतकऱ्याचे किमान सात लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना राजाेली (ता. माैदा) येथे साेमवारी (दि. ३) दुपारी घडली.
तणसीचा वापर गुरांचे वैरण म्हणून केला जात असल्याने मारोती नत्थू वाडीभस्मे, रा. राजोली, ता. मौदा यांनी शेतातील तणस मजुरांकरवी गाेळा करून ती गावातील गाेठ्याजवळ ढीग लावून ठेवायला सुरुवात केली हाेती. ती तणस ट्रॅक्टरने शेतातून आणली जात हाेती. साेमवारी दुपारी त्यांनी तणसीची एक खेप आणून ती ट्राॅली रिकामी केली आणि मजूर पाणी पिण्यासाठी जवळच असलेल्या सावलीत गेले. ट्रॅक्टर व ट्राॅली मात्र तणसीजवळच उभी हाेती.
अवघ्या १० मिनिटात ट्राॅलीच्या मागच्या भागाकडील तणसीचे पेट घेतला. तणसीने पेट घेतल्याचे लक्षात येताच मजुरांनी ती आग विझविण्यासाठी धडपड सुरू केली. आग नियंत्रणात येईपर्यंत तणसीसेबतच त्यांचा एमएच-४०/एएम-७८५७ क्रमांकाचा ट्रॅक्टर व ट्राॅली जळाली. यात आपले सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती माराेती वाडीभस्मे यांनी दिली. या आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. शिवाय, त्यांनी अराेली (ता. माैदा) पाेलीस ठाण्यात तक्रारही नाेंदविली. ठाणेदार अशाेक काेळी, पाेलीस उपनिरीक्षक ऋषिकेश चाबुकस्वार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बीट जमादार महंत यांनी सरपंच मीना तांडेकर, उपसरपंच काशिनाथ पोटभरे, पोलीस पाटील, तलाठी यांच्या उपस्थितीत पंचनामा केला.