शरद मिरे
भिवापूर : गत काही वर्षांपासून शेतात रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमिनीत कडकपणा आला आहे. त्यामुळे एरवी शेतजमीन भुसभुशीत करणाऱ्या बैलजोडीची ताकद आता कमी पडत आहे. अशात विज्ञान व तंञज्ञानाने शेतात पाऊल टाकले. बैलजोडीऐवजी ट्रॅक्टरने मशागत करण्याचे प्रमाण वाढले. यातूनच शेतकऱ्यांचे मशागतीचे गणित परावलंबी झाले. आता डिझेलचे दर (नागपूर जिल्हा ८२.४४ रुपये) गगनाला भिडल्याने ट्रॅक्टरने मशागत करणे शेतकऱ्याच्या हाताबाहेर गेले आहे. पूर्वी पारंपरिक पध्दतीने शेती होत असल्याने शेतकऱ्याकडे बैलजोड्या होत्या. अलीकडे त्यांच्या रखवालीचा खर्च वाढला. चारापाणी व रखवालीसाठी न मिळणाऱ्या मजूरवर्गामुळे शेतकऱ्यांनी बैलजोडीने शेताची वाहिजूपी कमी केली. महत्त्वाचे म्हणजे बैलजोडीने शेताच्या मशागतीसाठी अधिक वेळ जातो. शिवाय शेतजमीन चिकट आल्यामुळे बैल पुढे सरकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बैलजोडीऐवजी झटपट काम पूर्ण करणाऱ्या ट्रॅक्टरची सोबत घेतली. शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर हा अखेरचा पर्याय आहे, हे कळून चुकल्याने प्रत्येक गावामध्ये ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. अनेकांसाठी ट्रॅक्टर हे रोजगाराचे साधनसुध्दा ठरले आहे. अशा परिस्थितीत आता डिझेलचे दर वाढल्याने त्याचा थेट फटका शेतीच्या मशागतीला बसला आहे. ट्रॅक्टरने शेतीची वाहिजूपी करणे हाताबाहेर झाले आहे.
मशागतीचा एकरी खर्च वाढला
मशागतीसाठी तासाप्रमाणे किंवा एकराप्रमाणे ट्रॅक्टरचे दर ठरले आहेत. प्रत्येक गावात मशागतीचे दर वेगवेगळे आहेत. यावर्षी डिझेल दरवाढीसह जीएसटीमुळे ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट उदा. ऑइल, टायर आदीच्या किमती वाढल्या आहेत. यापूर्वी हरभऱ्याकरिता एकरी ३,५०० रुपये खर्च येत होता. दरवाढीमुळे आता ४ ते ५ हजार रुपये खर्च येतो. पूर्वी धानाकरिता एकरी ५ हजार रुपये खर्च यायचा. आता ६,५०० रुपयांवर गेला आहे. कपाशीकरिता एकरी येणारा ७ हजारांचा खर्च आता ८,५०० रुपयांवर गेला आहे. हा खर्च केवळ ट्रॅक्टरने केलेल्या मशागतीसाठी आहे. बी-बियाणे, खते, औषधी हा खर्च वेगळाच आहे.
---
शेतकामासाठी मजूर मिळत नाही. त्यामुळे शेतातील बहुतांश सर्व कामे यंत्रावर आली आहेत. शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर मुख्य माध्यम ठरले आहे. अशात डिझेलचे भाव वाढल्याने त्याचा थेट परिणाम शेती क्षेत्रावर झाला आहे. एकीकडे नैसर्गिक प्रकोप शेतकऱ्यांचा पिच्छा सोडत नसताना, आता डिझेलचे वाढलेले दर शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसले आहे. अशा परिस्थितीत शेती करायची कशी, हा प्रश्नच आहे.
- निखिल वराडे, शेतकरी, नक्षी
---
आधी परतीचा पाऊस त्यानंतर पिकांवर विविध रोगांसह किडींचा प्रादुर्भाव यामुळे शेतातील उभ्या पिकांचे होत्याचे नव्हते झाले. हातात पीक राहिले नाही. यावर्षी शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्याकडे पैसा नाही. डिझेलचे दर वाढले आहे. त्यामुळे ट्रॅक्टरचालकही नगदी पैसे मागतात. ज्या प्रकारे डिझेलचे दर वाढले, त्याप्रमाणे शेतमालाचे भाव वाढणे आवश्यक आहे.
- अमोल चौधरी, शेतकरी, रा. सेलोटी
-------
डिझेलचे दर वाढल्याने साहजिकच शेतीच्या मशागतीसह इतर कामाचे दर वाढणार आहेत. चालकाची मजुरी वाढली आहे. जीएसटीमुळे स्पेअर पार्टच्या किमती वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम ट्रॅक्टरच्या सेवेवर पडतो. शेतकऱ्याकडून जास्त दर घेण्याचा प्रश्नच नाही. डिझेलसह स्पेअर पार्टचे दर कमी झाल्यास, ट्रॅक्टरच्या सेवेचे दरसुध्दा आपसूकच कमी होईल.
- बालाजी देवाळकर, ट्रॅक्टर मालक
मशागतीचे दर (प्रति एकर)
नांगरणी
२०२० - ६०० रुपये
२०२१ - ७०० रुपये
रोटावेटर
२०२० - १००० रुपये
२०२१ -१,२०० रुपये
खुरटणी
२०२० - ७०० रुपये
२०२१ - ८०० रुपये
पेरणी
२०२० - ८०० रुपये
२०२१ - ९०० रुपये