कैलास निघाेट
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : माेगरकसा संरक्षित जंगलातील सागवान झाडे ताेडल्यानंतर ती ट्रॅक्टरच्या ट्राॅलीत भरण्यात आली. हा ट्रॅक्टर मध्येच जंगलातील चिखलात फसला. त्यामुळे तस्कारांनी सागवान लाकडं तिथेच टाकून पळ काढल्याने ही तस्कारी उघड झाली. या प्रकरणात वनविभागाने पाच जणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना दाेन दिवसाची वनकाेठडी सुनावली आहे. वनकाेठडीचा काळ वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणात चिंतामण हरी मेहेर, पंकज बबन साेनवाने, सुधाकर मसराम, सुधाकर काेेकाेडे व अविनाश मरकाम या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. चिंतामण हा यातील मुख्य आराेपी असून, त्याने काही दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांच्या नावे असलेली सागवान झाडे चाेरून ताेडली व ती भंडारा येथील ठेकेदाराला विकली हाेती. त्यावेळी त्याने लाकडं वाहून नेण्यासाठी ट्रॅक्टर किरायाने घेतला हाेता. या प्रकरणात त्याच्यावर काेणतीही कारवाई न झाल्याने त्याची हिंमत वाढली. पुढे त्याने सागवान झाडे ताेडून विकण्यासाठी काही साथीदार गाेळा केले.
जंगलात काही ताेडलेली लाकडं आणि झाडांचे बुंधे आढळून आल्याने या तस्करीचे बिंग फुटले. सुरुवातीला चिंतामणने या तस्करीला नकार दिला हाेता. मात्र, ट्रॅक्टरचालक सुधाकर मसरामने सत्यता सांगितल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चिंतामण जंगलातील नाल्यांमधील रेतीची चाेरीदेखील करायचा. त्यामुळे त्याचे पवनी वनविभागातील काही कर्मचाऱ्यांशी जवळीक आहे. वन अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा निरपेक्ष तपास केल्यास माेठे मासे गळाला लागण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी वन अधिकाऱ्यांनी आराेपींकडून महत्त्वाची माहिती मिळवून त्या दिशेने तपास करणे व दबावाला बळी न पडणे आवश्यक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
...
ओव्हरलाेड लाकडं अंगलट
या सर्वांनी घटनेच्या रात्री संरक्षित जंगलातील सागवान झाडे ताेडली. त्यांना सर्व लाकडं एकाच खेपेत न्यायची असल्याने ती ट्रॅक्टरच्या ट्राॅलीत ठेवली. त्यामुळे ट्रॅक्टर ओव्हरलाेड झाला हाेता. त्यातच पावसाला सुरुवात झाली. त्यापूर्वीही पाऊस येऊन गेला हाेता. त्यामुळे जंगलातील काही भागात चिखल व दलदल तयार झाली हाेती. अंधारात चिखल व्यवस्थित लक्षात न आल्याने ट्रॅक्टर फसला. त्यामुळे त्यांनी ट्राॅलीतील काही लाकडं तिथेच टाकली व काही साेबत नेली. ही लाकडं चिंतामणने ठेक्याने केलेल्या शेतात लपवून ठेवल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी रितेश भाेंगाडे यांना मिळाली हाेती.
...
आराेपींना न्यायालयाने दाेन दिवसांची वनकाेठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, यात आराेपींची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. तपास कार्यात हयगय केली जाणार नाही.
- रितेश भोंगाडे,
वनपरिक्षेत्र अधिकारी, पवनी