लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण देताना २ ऑक्टोबर गांधी जयंतीपासून प्लास्टिकचा उपयोग न करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला समर्थन देताना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) एकदाच उपयोगात येणाऱ्या प्लास्टिकच्या विक्रीवर आणि वापरावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. देशातील ७ कोटींपेक्षा जास्त किरकोळ व्यापारी कॅटचे सदस्य आहेत, हे विशेष.याकरिता कॅटने सहयोगी कंपनी ऑल इंडियन कन्झुमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन आणि फेडरेशन ऑफ ऑल इंडिया डिस्ट्रीब्यूटर्स असोसिएशनने सर्व कॉर्पोरेट कंपन्यांना २ ऑक्टोबरपूर्वी उत्पादन आणि तयार उत्पादनांची विक्री बंद करण्यासह पर्यायी उत्पादनांची निर्मिती करण्याचे आवाहन केले आहे. कंपन्यांनी एकल प्लास्टिकची निर्मिती बंद केल्यास संपूर्ण देशातील वितरक, होलसेलर, रिटेलर्स आणि अन्य व्यापारी या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यात यशस्वी होतील.संपूर्ण देशात ७ कोटींपेक्षा जास्त किरकोळ व्यापारी आहेत. त्यापैकी ५ लाख व्यापारी एफएमसीजी उत्पादनांचे वितरक म्हणून काम करतात. त्यांच्याशी ३० लाख किरकोळ व्यापारी जुळले आहेत. अखिल भारतीय धर्तीवर बहिष्कार टाकल्यास एकल प्लास्टिक निर्मिती बंद होईल.कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी सांगितले की, एफएमसीजी, ग्राहकोपयोगी वस्तू, दैनिक उपयोगाच्या वस्तू, औषधांचे पॅकेजिंग आदींसाठी उपयोगात येणारे एकल प्लास्टिक पर्यावरणाला घातक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर गंभीर असल्यामुळे त्यांनी लाल किल्ल्यावरून प्लास्टिक बंदीची अप्रत्यक्ष घोषणा केली होती. त्यामुळे उत्पादक, कॉर्पोरेट कंपन्यांनी उत्पादनात अथवा तयार मालाच्या पॅकेजिंगसाठी एकल प्लास्टिकचा उपयोग करू नये.भरतीया म्हणाले, कॅट देशातील ४० हजारांपेक्षा जास्त ट्रेड असोसिएशन आणि फेडरेशनच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना वस्तू नेण्यासाठी प्लास्टिकऐवजी ज्यूट बॅगचा उपयोग करण्यावर जागरूक करण्यात येणार आहे. कॅटने २९ ऑगस्टला दिल्लीत होणाऱ्या सर्व राज्यातील व्यापारी असोसिएशनच्या एका राष्ट्रीय संमेलनात या मुद्यावर चर्चा आणि भविष्यातील धोरण तयार करण्याचे आवाहन केले आहे.एआयपीसीडीएफचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधानांचे आवाहन पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी एफएमसीजी आणि कन्झुमर ड्युरेबल कंपन्यांवर आहे. कारण सामान्यांतर्फे या उत्पादनांचा दैनंदिन जीवनात उपयोग करण्यात येतो. कंपन्यांनी एकल प्लास्टिकसाठी पर्यायी योजना तयार करावी. वितरकांनी अखिल भारतीय स्तरावर पंतप्रधानांच्या आवाहनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
एकल उपयोगाच्या प्लास्टिकवर व्यापाऱ्यांचा २ ऑक्टोबरनंतर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 9:38 PM
कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) एकदाच उपयोगात येणाऱ्या प्लास्टिकच्या विक्रीवर आणि वापरावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
ठळक मुद्देकंपन्यांनी उत्पादन बंद करावे : जागरूकतेचे ‘कॅट’चे आवाहन