लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या जाचक आदेशाविरुद्ध नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या (एनव्हीसीसी) नेतृत्त्वात विविध व्यापारी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या बंद आंदोलनाला व्यापाऱ्यांच्या १०० टक्के प्रतिसाद मिळाला. नागपुरातील महाल, सक्करदरा, बडकस चौक, इतवारी, मस्कासाथ, शहीदर चौक, गांधीबाग होलसेल क्लॉथ मार्केट, लोहाओळ, धरमपेठ, सीताबर्डी, खामला, जरीपटका आदींसह सर्वच बाजारपेठा बंद होत्या.
दुकानांसाठी ऑड-इव्हन पद्धत आणि व्यापाऱ्यांना परवाने व कोरोना चाचणी बंधनकारक करण्याच्या आदेश मनपा आयुक्तांनी दिला होता. व्यापारी ऑड-इव्हनचे पालन करीत आहेत. याशिवाय परवाना आणि कोरोना चाचणी बंधनकारक करण्याला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. परवान्याची पद्धत रूढ झाल्यास व्यापाऱ्यांना पुढे त्रास होणार आहे. परवाना नाकारण्याच अधिकार मनपाला असल्याने इन्स्पेक्टर राज आणि भ्रष्टाचाराला चालना मिळणार असल्याचा आरोप एनव्हीसीसीचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी केला आहे. याशिवाय १८ ऑगस्टपर्यंत कोरोना चाचणी न केलेल्या व्यापाऱ्यांचे दुकान बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. हे आदेश मागे घेण्याची मागणी आंदोलनादरम्यान व्यापाऱ्यांनी केली.
अश्विन मेहाडिया यांच्या नेतृत्त्वात व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळ १० वाजेपासून विविध बाजारपेठांमध्ये जाऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधला आणि १०० टक्के बंद पाळण्याचे आवाहन केले. मेहाडिया म्हणाले, व्यापाऱ्यांना जाचक आणि व्यवसायाला मारक असलेल्या आदेशाविरुद्ध लढा देण्याची व्यापाऱ्यांची भूमिका आहे. व्यापारी प्रशासनाविरोधात नसून आयुक्तांनी अनावश्यक आदेश देऊन व्यापाऱ्यांना त्रास देऊ नये. गेल्या चार महिन्यांपासून व्यापारी आर्थिक संकटात असून खर्च निघणे कठीण झाले आहे. परवाने आणि कोरोना चाचणी या अनावश्यक गोष्टी व्यापाऱ्यांवर लादून आयुक्त काय साधत आहेत, असा सवाल त्यांनी केला. सर्व आदेश रद्द करेपर्यंत व्यापाऱ्यांचा लढा सुरूच राहणार आहे.
सकाळी १० वाजता चेंबरच्या सिव्हील लाईन्स येथील कार्यालयात सभा झाली. आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध एकत्रित लढा देण्याचे व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आले. त्यानंतर १०० पेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी लोकमत चौक, व्हेरायटी चौक, लक्ष्मीभुवन, धरमपेठ, मस्कासाथ, इतवारी, सराफा बाजार, शहीद चौक, नंगापुतळा, होलसेल क्लॉथ मार्केट, जरीपटका, सक्करदरा या बाजारपेठांमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना १०० टक्के बंद पाळण्याचे आवाहन केले.