लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : महादुला येथील मुख्य बाजारपेठेत गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटना वाढल्या असून, व्यापारी त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे पाेलीस यंत्रणाही या चाेरट्यांना पकडण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे या भागात पाेलीस गस्त वाढविण्यात यावी तसेच महादुला नगर पंचायतीने सुरक्षात्मक उपाययाेजना कराव्या, अशी मागणी महादुला व्यापारी संघर्ष समितीने नगराध्यक्ष राजेश रंगारी व पाेलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महादुला येथील व्यापारी बाजारपेठ महामार्गाला लागून आहे. या ठिकाणी काही दिवसापासून पुलाचे काम सुरू असल्याने सर्व्हिस मार्गावर वर्दळ वाढली आहे. परंतु या ठिकाणी किरकोळ चोऱ्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. यामुळे व्यापाऱ्यांना असुरक्षित वाटत असून, त्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी समितीने केली आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष मुन्ना कुरेशी, उपाध्यक्ष राजकुमार शाहू, रवी भागवतकर, सचिव अहमद शेख, कोषाध्यक्ष श्याम करमरकर, शरद वांढे, कपिल विरघट आदी उपस्थित होते. पाेलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी, अशी आग्रही मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकाेनातून त्यांच्या मागणीचा विचार करता महादुला नगर पंचायच्यावतीने बाजार परिसर व व्यापारी संकुल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी दिली.