जलालखेडा : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ‘ब्रेक द चेन’ अभियान राबवीत राज्य सरकारने अनेक दुकानांना टाळे लावले आहे. पण यामुळे व्यापारीवर्गात मोठ्या प्रमाणात रोष दिसून येत आहे. याबाबत गुरुवारी नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील व्यापाऱ्यांनी मोर्चा काढत सरकारच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. शासनाने काही अटी व नियम लावून दुकान सुरू ठेवण्याची परवानगी देण्याबाबत निवेदन जलालखेडा येथील ठाणेदार हरिश्चंद्र गावडे यांना दिले.
गतवर्षी २३ मार्चपासून लागलेल्या लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी पूर्णपणे सहकार्य केले होते. त्यामुळे अतोनात नुकसानदेखील झाले होते, तरीसुद्धा एकजुटीने शासनाला मदत केली होती. त्यातून कसेबसे सावरून जेमतेम व्यापार चालू झाले असताना आता पुन्हा ६ एप्रिलपासून लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमूळे जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, वीज बिल, घर कर, शासनाचा कर, दुकान भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर खर्च यापुढे करणे अशक्य आहे. यामुळे यातून सावरण्यासाठी दुकानदार व व्यापारी यांना काही अटी व नियम घालून व्यापार करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूरचे पालकमंत्री, काटोलचे आमदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, नरखेडचे तहसीलदार यांनासुद्धा पाठविण्यात आल्या आहेत.