जिल्हाधिकारी-मनपा आयुक्तांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात लेव्हल १ नुसार निर्बंध लागू राहावेत, या मागणीसाठी एकजूट झालेले व्यापारी आता रस्त्यावर उतरले आहेत. सोमवारी व्यापाऱ्यांनी संविधान चौक ते मनपा मुख्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून आपला आवाज बुलंद केला.
कोविड संकटामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे शहरातील व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या निर्बंधांमुळे हॉटेल, रेस्टाॅरंट, ट्युशन क्लासेस, स्टेशनरी, लॉन, एम्युजमेंट पार्क, सिनेमागृह, मंगल कार्यालय आदींसह काही क्षेत्र सर्वाधिक प्रभावित होत आहेत. नागपूर हे लेव्हल १ मध्ये आहे तरीही शहरात लेव्हल ३ चे निर्बंध लागू आहेत. हा प्रकार असाच सुरु राहिला तर शहरातील व्यापार पूर्णपणे बरबाद होईल. त्यामुळे सर्वाधिक प्रभावित व्यापाऱ्यांच्या २३ संघटनांनी मिळून ‘सरकार जगाओ, वाणिज्य बचाओ संघर्ष समिती’ स्थापन केली आहे. या समितीच्या बॅनर अंतर्गत सोमवारी पदयात्रा काढण्यात आली.समितीचे संयोजक दीपेन अग्रवाल, सहसंयोजक दिलीप कामदार आणि सचिव तेजिंदरसिंह रेणू यांच्या नेतृत्वात दुपारी ४ वाजता संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही पदयात्रा मनपा मुख्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाली. पदयात्रेत मोठ्या संख्येने व्यापारी सहभागी झाले हाेते. यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि नंतर जिल्हाधिकारी विमला आर. यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी दीपेन अग्रवाल म्हणाले, कोविड संकटामुळे व्यापारी मागील दीड वर्षापासून सरकार व प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. सध्या शहरात मोजकेच रुग्ण शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत लेव्हल ३ चे निर्बंध हटवून लेव्हल १ चे निर्बंध लावण्याची गरज आहे. असे न झाल्यास व्यापारी पूर्णपणे बरबाद होतील. सरकारने व्यापाऱ्यांचे हित लक्षात घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
पदयात्रेत अर्जुनदास आहुजा, सचिन पुनियानी, विष्णू पचेरीवाला, तरुण निर्बाण, राजेश लखोटिया, ॲड. संजय के. अग्रवाल, अमित हरिंदर बेंबी, विनय धर्माधिकारी, ललित गांधी, दिनेश नायडू, प्रशांत उगेमुगे, इंदरजीत सिंह बावेजा, भवानी शंकर दवे, विजय तलमले, राजीव जैस्वाल, संजय काले, आशिष देशमुख, उदय ढोमणे, सुनील भाटिया, गोल्डी बिन्द्रा, संजय झांस, अभिनव ठाकूर, दीपक देवसिंघानी, प्रताप देवानी, दीपक खुराणा, सचिन इनकाने, सुनील राऊत, दर्शन पांडे, अंगद अरोरा, मनदीप सिंह पदम, प्रकाश त्रिवेदी, विनोद त्रिवेदी, हेमंत त्रिवेदी, तरुण मोटवानी, विजय जैस्वाल, राणासिंह भामरा, गोगी भसीन, शरद अग्रवाल, ब्रिजेश खेमका, राजेश अग्रवाल, प्रो. रजनीकांत बोंद्रे, प्रो. सूरज अय्यर, प्रो. पानिनी तेलंग, प्रो. विराग मिटकरी आदी व्यापारी उपस्थित होते.
बॉक्स
- आज कार-बाईक रॅली
नागपुरात लेव्हल १ नुसार निर्बंध लागू करण्याच्या मागणीसाठी सरकार जगाओ वाणिज्य बचाओ संघर्ष समितीच्या वतीने उद्या मंगळवारी कार-बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. ही रॅली २७ जुलै रोजी दुपारी १ वाजता हिस्लॉप कॉलेजसमोरून निघेल. विविध मार्गांवरून ही रॅली मार्गक्रमण करीत व्हेरायटी चौकात पोहोचेल. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप होईल.