नागपूर : आठवडाभर पूर्ण लाॅकडाऊन केल्यानंतर २२ मार्चपासून टाळेबंदीच्या नवीन नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. नवीन नियमानुसार शहरातील सर्व दुकाने दुपारी ४ वाजतापर्यंत सुरू ठेवण्यात येतील तर दूध व डेअरी पदार्थांची दुकाने सायंकाळी ७ वाजतापर्यंत सुरू ठेवता येतील. महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीचे शहरातील व्यापारी प्रतिनिधी संघटनांनी स्वागत केले आहे.
कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे अध्यक्ष बी. सी. भरतिया यांनी, मनपा प्रशासनाने संतुलित निर्णय घेतल्याची भावना व्यक्त केली. यामुळे काेराेना संसर्गावर नियंत्रण मिळविता येईल आणि व्यापारही बुडणार नाही. अर्धा दिवस का हाेइना व्यावसायिक हालचाली सुरू राहणार, याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. येणाऱ्या हाेळी उत्सवात नागरिक खरेदी करू शकतील, त्यामुळे व्यापाऱ्यांचेही नुकसान हाेणार नाही. भरतिया यांनी व्यापाऱ्यांनाही काेराेना नियमांचे कठाेरतेने पालन करण्याचे आवाहन केले आहे. दुकाने शक्य तितक्या लवकर सुरू करून नियमानुसार बंद करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी नवीन नियमावलीसाठी पालकमंत्री नितीन राऊत, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचे आभार व्यक्त केले. नवीन नियमावलीमुळे व्यापाऱ्यांना थाेडा दिलासा मिळेल व दुकाने सुरू राहिल्याने नुकसान कमी हाेइल. नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष विष्णुकुमार पचेरीवाला यांनी टाळेबंदीच्या नवीन नियमांचे स्वागत केले. दुपारी ४ वाजतापर्यंत दुकाने सुरू राहणार असल्याने माेठा दिलासा मिळाला आहे. मार्च एंडिंग आणि हाेळीच्या पर्वावर प्रशासनाने चांगले पाऊल उचलल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.