नागपूर : नागपूरसह संपूर्ण विदर्भाचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र धापेवाडा येथील आषाढी महोत्सव यावर्षी रद्द करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी प्रशासनाने सोमवारी हा निर्णय घेतला. नागरिकांनी प्रशासनाच्या या निर्णयाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या २८० वर्षांपासून अखंडितपणे श्रीक्षेत्र धापेवाडा येथे मंदिराच्या परंपरेनुसार आषाढीनिमित्त परिपाठाचे कार्यक्रम होत असतात. यासाठी या मंदिराचे अध्यक्ष रुद्रप्रतापसिंह पवार यांनी यावर्षी परवानगी मागितली होती. मात्र कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता राज्य शासनाने कडक निर्बंध लावले आहेत.
सध्या नागपूर जिल्ह्यात स्तर ३ चे निर्बंध लागू असल्याने सदर परिपाठ कार्यक्रमास परवानगी देता येणार नाही. तसेच यासारख्या इतर धार्मिक कार्यक्रमांनादेखील परवानगी देता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी हा उत्सव रद्द झाला हे समजून कोणतीही गर्दी करू नये, प्रशासनाला सहकार्य करावे. घरी रहावे, सुरक्षित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने सोमवारी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अविनाश कातडे यांनी या संदर्भातील निर्देश जारी केले आहेत.
बॉक्स
- बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करा
२१ जुलै रोजी बकरी ईद हा मुस्लिम बांधवांचा सण येत आहे. तथापि यावर्षी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राज्यात लागू आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या वर्षीची बकरी ईद अगदी साधेपणाने साजरी करावी. तसेच शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.