लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडू शकते ही शक्यता आधीच वर्तविण्यात आली होती. त्यामुळे अधिवेशन काळात शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन केले असता त्यात चौकात वाहतूक पोलीस तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच शहरात असा जाम लागला की वाहतूक विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला. सर्वसामान्य नागरिक जाममुळे त्रस्त झालेत. गुरुवारी ‘लोकमत’ने वाहतूक विभागाच्या तयारीची पडताळणी करण्यासाठी शहरातील प्रमुख चौकांना भेट दिली असता बहुतांश चौकात वाहतूक पोलीस दिसलेच नाहीत. तर ज्या चौकात वाहतूक पोलीस होते तेथे ते चालान फाडण्यात आणि आपसात गप्पा मारण्यात व्यस्त असल्याचे चित्र दृष्टीस पडले.शहरात सुरु असलेल्या महामेट्रो आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामामुळे आधीच वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. अशा स्थितीत पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यामुळे जाम लागण्याची शक्यता वाहतूक विभागाला प्रशासनाने देऊन आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. तरीसुद्धा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध चौकात आणि मार्गावर जाम लागला होता. त्यानंतर गुरुवारी ‘लोकमत’च्या चमूने शहरातील प्रमुख मार्गांची पाहणी केली असता बहुतांश मार्गावर वाहतूक पोलिसांची गैरहजेरी आढळली. वाहतूक व्यवस्था रामभरोसे सुरु होती. ज्या चौकात नेहमीच जामची समस्या असते तेथेही वाहतूक विभागाने कोणतीच व्यवस्था केलेली नव्हती. काही चौकात वाहतूक पोलीस दिसले परंतु ते चालान फाडण्यात व्यस्त होते. काही वाहतूक पोलीस चहा पिताना दिसले तर मोजकेच वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रित करत होते.‘लोकमत’ने काय पाहिले
- काटोल नाका चौकात वाहतूक पोलीस चहा टपरीवर बसलेले दिसले
- पोलीस लाईन तलाव चौकात एक वाहतूक पोलीस झाडाच्या सावलीत उभा होता
- पागलखाना चौकात वाहतूक पोलीस चालान फाडण्यात व्यस्त होता
- ट्रॅफिक पार्क चौकात एकटा पोलीस कर्मचारी ड्युटीवर तैनात होता
- लॉ कॉलेज चौकात वाहतूक पोलीस गैरहजर होते