नागपूर : कळमना रेल्वे क्रॉसिंग गेटवर रेल्वे इंजिन बंद पडल्याने शेकडो वाहनधारकांचा खोळंबा झाला. यामुळे गेटच्या दोन्ही बाजूला वाहनांची लांबच लांब लाईन लागली. त्यामुळे या भागातील नागरिक आणि वाहनधारकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला होता. शनिवारी रात्री ही घटना घडली.ठिकठिकाणचे क्रॉसिंग गेट बंद करून भुयारी किंवा उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्याचे दावे रेल्वे मंत्रालयाकडून नियमित केले जात आहे. मात्र, नागपूरसह अनेक शहराच्या मधोमध, वर्दळीच्या भागातील रेल्वे क्रॉसिंग गेट सुरूच आहेत. त्यामुळे त्या भागातील हजारो वाहनधारकांना दिवसरात्र त्रास होतो. मालगाडी असो की प्रवासी गाडी थोड्या थोड्या वेळाने जात-येत असल्याने गेटमन क्रॉसिंग गेट बंद करतो आणि त्यामुळे तेथून जाणे येणे करणाऱ्या वाहनधारकांचा, नागरिकांचा खोळंबा होतो. खास करून महत्वाच्या कामानिमित्त निघालेल्या मंडळींना, विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना त्याचा मोठा त्रास होतो. शनिवारी रात्री असेच झाले.रेल्वे इंजिन जाणार असल्याने गेटकिपरने रेल्वे क्रॉसिंगचे गेट बंद केले. काही वेळाने इंजिन आले. मात्र नेमके गेटच्या मधोमध येऊन ते बंद पडले. त्यामुळे बराचवेळेपर्यंत गेट बंद होते. त्यामुळे तेथून जाण्या-येण्यासाठी उभे असलेल्या शेकडो वाहनधारकांना मोठा त्रास झाला. कळमन्यातील ज्या भागात हे क्रॉसिंग गेट आहे, त्या भागात २४ तास वर्दळ असते. पाच-दहा मिनिटातच गेटच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहने लागतात. अशात १५ ते २० मिनिटे हे गेट बंद असल्याने वाहनांची लांबच लांब रांग लागली. परिणामी परिसरातील नागरिकांनाही त्याचा त्रास झाला. या संबंधाने रेल्वे पोलिसांकडे चाैकशी केली असता त्यांनी इंजिन थोडाच वेळ होते, त्या गेटचाच प्रॉब्लेम आहे. ते जाम असल्याने लावता-उघडताना थोडा त्रास होतो, अशी माहिती दिली.सीएमचा ताफा खापरखेड्यात अडकला होताअशाच प्रकारे एक रेल्वेगाडी येणार असल्याने खापरखेडा रेल्वे क्रॉसिंग गेटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडकून पडला होता. कोराडीवरून खापरखेडा मार्गाने रामटेकला प्रचारासाठी जात असताना १० दिवसांपूर्वी ही घटना घडली होती.
रेल्वे इंजिनमुळे कळमना गेटवर ट्रॅफिक जाम, अनेकजण ताटकळले
By नरेश डोंगरे | Published: April 28, 2024 8:48 PM