लोकमत न्यूज नेटवर्क
कुही : शहरातील मुख्य मार्गावरील अवैध वाहन पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्किंगमुळे वाहतूक काेंडी ही नित्याची बाब झाली असून, बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर पाेलीस यंत्रणेने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
नगर पंचायत कार्यालय ते नागोबा चौक हा वर्दळीचा मुख्य रस्ता शहराच्या मधोमध आहे. या रस्त्याची रुंदी आधीच कमी असून, याच रस्त्यालगत अनेक ठिकाणी नागरिक आपले वाहन पार्क करतात. यामुळे रहदारीस अडसर निर्माण हाेताे. शिवाय बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने व दुकाने याच मार्गावर असून, पार्किंगची सुविधा अपुरी असल्याने ग्राहकांची वाहने रस्त्यावरच पार्क केली असतात. तसेच या मार्गावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे कार्यालय असल्याने बँकेत व्यवहारासाठी आजूबाजूच्या खेड्यातून नागरिक मोठ्या संख्येने कुही येथे येतात. बँकेसमोर पार्किंगची व्यवस्था नसल्याने अनेक जण आपली वाहने रस्त्यावरच पार्क करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते.
काही दिवसापूर्वी पाेलिसांनी रस्त्यावर वाहने पार्क करणाऱ्यांवर व वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली हाेती. त्यामुळे अवैध पार्किंग करणाऱ्यांवर लगाम लागला हाेता. परंतु आता ही समस्या जैसे-थे झाली आहे. नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार चंद्रकांत मदने यांनी या बाबीकडे लक्ष पुरवून बेशिस्त वाहने पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांची आहे.