नागपूर :
दिवाळीची सर्वत्र जोरदार खरेदी सुरू असल्यामुळे नागपूर शहरातील विविध भागांतील बाजारपेठा आणि रस्ते फुलले आहेत. परिणामी जागोजागी वाहनांची प्रचंड गर्दी होऊन जिकडेतिकडे ट्रॅफिक जाम होत आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून नागपूरकर आणि आजूबाजूच्या गावातील मंडळी विविध भागांतील बाजारात गर्दी करत आहेत. सार्वजनिक वाहनांऐवजी अनेक जण दुचाकी, टॅक्सी आणि खासगी वाहनांचा उपयोग करत असल्याने शहरातील बाजारालगतच्या विविध मार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी झालेली आहे. त्यामुळे जरीपटका, सदर, सीताबर्डी, धरमपेठ, लक्ष्मीनगर चौक, लक्ष्मीभवन चौक, खामला, गोपालनगर, प्रतापनगर, नंदनवन, मानेवाडा, धंतोली, गणेशपेठ, कॉटन मार्केट, मेडिकल चौक, बडकस चौक, महाल, दोसर भवन चौक, गांधीबाग, नंगा पुतला चौक, कमाल चौक, लकडगंज, सुभाष चौक, आग्याराम देवी चौक, रामेश्वरी, सक्करदरा भागात असलेल्या बाजारात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली आहे. एकाच वेळी हजारो नागरिक आपापली वाहने रस्त्यावर घेऊन आल्यामुळे जागोजागी ट्रॅफिक जाम होत आहे.
रेल्वे स्थानकाजवळच्या राम झुला आणि गणेश टेकडी मंदिर जवळच्या मानस मंदिर चौकात तसेच कॉटन मार्केट परिसरात वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने दर दोन-तीन मिनिटांनी जाम होत असल्याचे चित्र आहे.
पार्किंगच्या समस्येमुळे वाहनधारक हैराणसकाळपासून रात्री उशिरापर्यंत विविध बाजारपेठात खरेदीदारांची गर्दी होत असतानाच पार्किंगची पुरेशी सुविधा शहरातील कोणत्याच भागात नाही. त्यामुळे वाहनधारकांची प्रचंड कोंडी होत आहे. मिळेल त्या ठिकाणी अनेक जण आडव्यातिडव्या गाड्या लावत असल्यानेही वारंवार ट्रॅफिक जाम होत आहे.
वाहतूक पोलिसांची धावपळसकाळपासून रात्रीपर्यंत विविध भागात ट्रॅफिक जामची स्थिती निर्माण होत असल्याने वाहतूक पोलिसांची प्रचंड तारांबळ उडाली आहे. एकाच वेळी अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्याचा कॉल येत असल्याने इकडे जाऊ की तिकडे पळू, अशी वाहतूक पोलिसांची स्थिती आहे.