- चालान कारवाई दरम्यानची घटना- ट्रिपलसीट अल्पवयीनांविरोधात प्रकरणाची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अल्पवयीन वाहनचालकांनी चालान कारवाईपासून वाचण्यासाठीच्या प्रयत्नात ट्रॅफिक पोलिसाला धडक देऊन जखमी केले. ही घटना लकडगंज पोलीस ठाणे परिसरातील आहे. लकडगंज विभागातील कर्मचारी प्रमोद खांबाळकर लकडगंज रेल्वे क्रॉसिंगजवळ वाहनांची तपासणी करत होते. त्यांना दुचाकीवर ट्रीपलसीट प्रवास करणारे अल्पवयीन मुले दिसली. प्रमोद यांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. परंतु, अल्पवयीन मुले दुचाकीचा वेग वाढवून पळू लागले. याच प्रयत्नात त्यांनी प्रमोद यांना धडक दिली. प्रमोद जखमी झाले. पोलिसांनी अल्पवयीन मुलांना बंदी बनवून शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, जखमी करणे व निष्काळजीपणे वाहन चालविण्याचे प्रकरण नोंदवले आहे.
दुचाकी वाहनचालकांवर कारवाई करताना अनेक ठिकाणी वादविवादाची प्रकरणे पुढे येत आहेत. यात काही वाहनचालकही अपघाताला बळी पडले आहेत. ‘लोकमत’ने अशा प्रकरणांचा खुलासाही केला आहे. काही दिवसांपूर्वी इतवारी येथील शहीद चौकात एका महिलेने अशाच प्रकरणात जोरदार गोंधळ माजवला होता. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याने पोलिसांची नाचक्कीही झाली होती.
.................