लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिग्नल बंद असतानाही दुचाकी दामटताना पकडल्या गेलेल्याकडून २०० रुपयांची लाच घेणे एका पोलीस कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले. दुचाकीचालकाने २०० रुपये लाच देतानाच मित्राकरवी त्या पोलिसाचा मोबाईलमध्ये व्हिडीओ तयार करून घेतला. हा व्हिडीओ शनिवारी व्हायरल झाल्याने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तडकाफडकी निलंबित केले. भुजंगराव थाटे असे त्या पोलीस हवालदाराचे नाव असून, तो वाहतूक शाखेच्या चेंबर ३ मध्ये कार्यरत होता.गणराज्यदिनाचे औचित्य साधून शहरातील विविध भागातून रॅली निघतात. त्यात काही तरुण हुल्लडबाजी करतात. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते आणि सर्वसामान्य नागरिकांची नाहक कुचंबणा होते. त्यामुळे अशा हुल्लडबाज वाहनचालकांना आवरण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना कडक आदेश दिले होते. त्यानुसार, शुक्रवारी गणराज्यदिनी शहरातील प्रत्येक चौकात, महत्त्वाच्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त होता. सेंट्रल एव्हेन्यूवरील दोसर भवन चौकात थाटेची नियुक्ती होती. शुक्रवारी सकाळी झेंडावंदन आटोपल्यानंतर थाटे त्याच्या सहकाऱ्यासह कर्तव्यावर हजर झाला. त्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने एका दुचाकीवर ट्रिपल सीट असलेल्या आणि सिग्नल बंद झाला असतानादेखील दुचाकी पुढे दामटणाऱ्या (सिग्नल तोडणाऱ्या) दुचाकीचालकाला अडवले. त्याला बाजूच्या तंबूत (पोलीस छावणी) नेले.२०० रुपये कशासाठी?हवालदार थाटेने दुचाकीचालकाला कारवाईचा धाक दाखवून ६०० रुपये मागितले. ती रक्कम आपल्याकडे नाही, असे दुचाकीचालकाने म्हटले असता थाटेने त्याला १२०० रुपये दंडाची चालान पावती बनविण्याचा धाक दाखवला. दुचाकीचालकाने एवढे पैसे नाही भरू शकत, असे म्हटले असता चालान पावती बनविण्यासाठी पेन आणि पावतीबुक हातात घेतले. यावेळी त्याला दुचाकीचालकाने येथेच निपटवून टाका, असे म्हटले असता त्याने ३०० रुपयांची लाच मागितली. दुचाकीचालकाने २०० रुपये समोर केले ते थाटेने आपल्या पॅन्टच्या खिशात कोंबले. या संपूर्ण घटनाक्रम आणि संभाषणाचे दुचाकीचालकाचा साथीदार मोबाईलमध्ये छायाचित्रण करीत होता. शेवटी दुचाकीचालकाने हे २०० रुपये कशासाठी घेतले, ते सांगा असे हवालदार थाटेला विचारले असता त्याने तू सिग्नल तोडला, त्यामुळे कारवाई न करता तुला सोडण्यासाठी, असे उत्तर दिले.व्हिडीओ बनविणारा अंधारातविशेष म्हणजे, अशाप्रकारची चिरीमिरी घेण्याचे गैरप्रकार वाढल्याने तसेच पोलिसांकडून वाहन उचलून नेण्याचे प्रकार वाढल्याने अनेक वाहनचालकांच्या मनात वाहतूक पोलिसांबद्दल तीव्र रोष आहे. लाचेसाठी चटावलेल्या दुचाकीचालकाने थाटेला लाच घेण्यासाठी प्रवृत्त केल्याचेही या व्हिडीओतून जाणवत आहे. त्यामुळे तो यापूर्वी थाटे किंवा या भागातील वाहतूक पोलिसांच्या लाचखोरीला बळी पडला असावा, त्यामुळे त्याने लाच देतानाचा हा व्हिडीओ पूर्वनियोजित योजना तयार करून बनवून घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तो लाच देणारा दुचाकीचालक कोण आणि त्याने कुणाच्या माध्यमातून हा व्हिडीओ तयार करून घेतला, ते अद्याप उजेडात आले नाही.गैरप्रकाराला वाव नाही : उपायुक्त परदेशीहा व्हिडीओ शनिवारी सकाळी व्हायरल झाला. तो पोलीस आणि पत्रकारांच्याही व्हॉटस्अॅप ग्रुपवर आल्याने सर्वत्र खळबळ निर्माण झाली. लाचेची रक्कम मागताना आणि ती स्वीकारताना थाटे त्यात स्पष्ट दिसत असल्याने वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांनी थाटेला तडकाफडकी निलंबित केले. या कारवाईमुळे शहरभर खासकरून पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. यासंबंधाने पोलीस उपायुक्त परदेशी यांच्याशी पत्रकारांनी संपर्क केला असता, व्हिडीओ बनविणारा कोण, ते अद्याप स्पष्ट झाले नाही. कुणी लाच मागितल्याची तक्रारही केली नाही. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडीओतून थाटे लाच घेताना दिसतात, त्यामुळे त्यांना आम्ही तडकाफडकी निलंबित केल्याचे उपायुक्त परदेशी यांनी सांगितले. अशाप्रकारे गैरप्रकार करणाऱ्या कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी पोलिसांना दिला आहे.