लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लहान भावाच्या वाढदिवसाची पार्टी मोठ्या भावाच्या जीवावर बेतली. पार्टी करून परत येताना कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कार दुभाजकावर धडकली आणि मोठ्या भावाचा मृत्यू झाला तर लहान भावासह तिघे गंभीर जखमी झाले. रविवारी रात्री वर्धा मार्गावरील शिवणगाव फाट्याजवळ हा अपघात घडला. श्रीदत्त संजय वराडे (वय २५) असे मृताचे नाव आहे. तर, जखमींमध्ये कार्तिक संजय वराडे (वय १९), गोपी संजय राजहंस आणि प्रथमेश रेबे यांचा समावेश आहे.महालमधील झेंडा चौकाजवळ राहणाऱ्या कार्तिक वराडेचा १५ नोव्हेंबरला जन्मदिवस होता. त्या दिवशी पार्टी देणे जमले नाही म्हणून वराडे बंधूंनी रविवारी रात्री वर्धा मार्गावरील एका ढाब्यावर कार्तिकच्या वाढदिवसाची पार्टी ठेवली होती. तेथे वराडे बंधूंसह त्यांचे मित्र वेगवेगळ्या वाहनांनी पोहचले. केक कापून जेवण आटोपल्यानंतर मध्यरात्री एका कारमध्ये श्रीदत्त, कार्तिक, संजय आणि प्रथमेश हे चौघे बसून नागपूरकडे परत येत होते तर, त्यांचे दुसरे मित्र वेगवेगळ्या वाहनांनी येत होते. कार श्रीदत्त चालवीत होता. मध्यरात्रीनंतर १.३० च्या सुमारास त्यांची कार शिवणगावजवळच्या मेट्रो रेल्वेस्थानकाजवळ येताच अचानक कारसमोर एक कुत्रा आडवा आला. चिंचभुवन पुलाच्या उतारावरून कार वेगात येत असल्याने श्रीदत्तला कार नियंत्रित करणे शक्य झाले नाही. कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याने करकचून ब्रेक मारल्याने अनियंत्रित कार दुभाजकावर धडकली. त्यामुळे कारमधील चौघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती कळताच सोनेगावचा पोलीस ताफा तेथे पोहचला. त्यांनी जखमींना मेडिकलला रवाना केले. तेथे डॉक्टरांनी श्रीदत्त याला मृत घोषित केले. या घटनेचे वृत्त पहाटे महालच्या झेंडा चौक परिसरात कळताच परिसरात शोककळा पसरली.वेग नडला:कुटुंबीयांना जबर मानसिक धक्काश्रीदत्त हा बीबीएच्या अंतिम वर्षाला शिकत होता. तो अभ्यासात हुशार होता आणि घरचीही जबाबदारी सांभाळत होता. विशेष म्हणजे, ज्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला तो कुत्राही या अपघातात ठार झाला. कारचा वेग जास्त असल्यामुळेच हा अपघात घडला. अपघातामुळे वराडे कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे.