लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका अनियंत्रित टिप्परने मोटरसायकलने जात असलेल्या दोघांना चिरडले. हा भीषण अपघात भिलगाव येथील नागलोक टर्निंग पॉर्इंट येथे गुरुवारी सकाळी झाला. धीरज मारोतराव आवळे (५२) रा. सौंसर आणि प्रशांत दुधराम धाडसे (३८ ) खापरी, अशी मृतांची नावे आहेत. या अपघातामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.धीरज आणि प्रशांत हे कामठी रोडवरील औषध कंपनीत काम करीत होते. धीरज मॅनेजर होता तर प्रशांत कामगार होता. दोघेही भिलगाव येथे भाड्याने राहत होते. सकाळी १० वाजता त्यांची ड्युटी होती. पारिवारिक सूत्रानुसार प्रशांत रोज सकाळी पायी ड्युटीवर जात होता. सकाळी ९.३० वाजता प्रशांत भिलगावच्या पानठेल्यावर उभा होता. त्याचवेळी धीरज बाईकने जात होता. त्याने प्रशांतलाही सोबत चलण्यास म्हटले. प्रशांत त्याच्या बाईकवर स्वार झाला. दोघेही कंपनीकडे जाऊ लागले. नागलोक टर्निंग पॉर्इंटजवळ एमएच/४०/वाय/४४४६ या क्रमांकाच्या टिप्परने धीरजच्या बाईकला धडक दिली. दोघेही बाईकसह खाली पडले. ही धडक इतकी भीषण होती की, दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.या अपघाताची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. अपघात होताच टिप्पर चालक पळू लागला. नागरिकांनी त्याचा पाठलाग केला, परंतु तो फरार झाला. औषध कंपनी घटनास्थळापासून जवळच असल्याने कंपनीतील कामगारही पोहोचले. त्यांनी दोघांच्याही घरच्यांना अपघाताची माहिती दिली. अपघाताने नागरिकांमध्ये संताप पसरला. लोक नारेबाजी करू लागले. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, यशोधरानगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी नागरिकांना शांत करून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी टिप्पर चालक रोशनलाल दमाहे (५५) रा. कामठी रोड याला अटक केली असून, अपघाताचा गुन्हा दाखल केला.या अपघातामुळे धीरज व प्रशांतच्या कुटुंबीयांसमोर उपाशी मरण्याची वेळ आली आहे. दोघेही त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावते होते. धीरजच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबात आई. पत्नी विद्या, १६ वर्षाचा मुलगा जय आहे. तर प्रशांतच्या कुटुंबात आई-वडील पत्नी सुलभा आणि मुलगा व मुलगी आहे.उभ्या ट्रकला धडकून मोटरसायकलस्वाराचा मृत्यूअमरावती रोडवर उभ्या ट्रकला धडकून मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर दानवले (३५) रा. आठवा मैल असे मृताचे नाव आहे. ज्ञानेश्वर बुधवारी रात्री बाईकने वडधामनाकडून जात होता. रस्त्यावर एम.एच. ४०/७७९७ क्रमांकाचा ट्रक निष्काळजीपणे उभा करण्यात आला होता. ट्रक उभा करताना सुरक्षेचे कुठलेही उपाय करण्यात आले नव्हते. रात्रीची वेळ असल्याने ज्ञानेश्वरला ट्रक दिसला नाही. ट्रकला धडकल्याने त्याचा मृत्यू झाला. वाडी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.