लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : भरधाव ट्रेलरने राेडलगत पायी जाणाऱ्या दाेघांना धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील नांदाेरा फाटा परिसरात ५ डिसेंबर २०२० राेजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली हाेती. या अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रेलर जप्त करण्यात काेंढाळी पाेलिसांनी दीड महिन्यानंतर यश आले असून, पाेलिसांनी चालकास अटक केली आहे.
रेखाराम पोखाराम सिवोल (३५, रा. केकट, ता. सिडवा, जिल्हा बाडनेर, राजस्थान) असे अटकेतील ट्रेलरचालकाचे नाव आहे. काेंढाळी नजीकच्या तवक्कल जिनिंग प्रेसिंगमध्ये सहा कामगार कामाला हाेते. त्यातील रमेश मंगाराम परिहार (३६) व त्याचा मित्र नेपाल मेघवाल (१८, रा.रामनगर, तडखी, ता. शेरगड, जिल्हा जोधपूर, राजस्थान) ५ डिसेंबर २०२० च्या रात्री पायी काेंढाळीला येत हाेते. दरम्यान, मागून वेगात आलेल्या वाहनाने त्यांना जाेरात धडक दिली. त्यात रमेशचा मृत्यू झाला तर नेपाल गंभीर जखमी झाला. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला.
दरम्यान, काेंढाळी पाेलिसांनी या भागातील पेट्राेलपंप परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात त्यांनी आरजी-१९/जीबी-५९२९ क्रमांकाच्या ट्रेलवर संशय व्यक्त करीत त्याचा शाेध सुरू केला. त्यामुळे पाेलिसांनी ट्रेलरचा हा क्रमांक या भागातील सर्व हाॅटेल्स, ढाबे, पानटपरी व पेट्राेलपंपवाल्यांना देऊन माहिती देण्याची सूचना केली. त्यामुळे हा ट्रेलर काेंढाळी परिसरातील एका पेट्राेलपंप परिसरात डिझेल घेण्यासाठी आल्याची माहिती पेट्राेलपंप कर्मचाऱ्याने पाेलिसांना दिली. पाेलिसांनी पाठलाग करून ट्रेलर पकडला आणि चालक रेखाराम याला विचारपूस केली. त्याने त्या अपघाताची कबुली देताच त्याला अटक करून ट्रेलर जप्त केला. ही कारवाई ठाणेदार विश्वास पुल्लरवार यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.