लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोटाची खळगी भरण्यासाठी पत्नी अन् दोन मुलांसह तो बंगळूरला मजुरी करण्यासाठी गेला. सुखाचा संसार सुरू असताना काम करताना तो मानेच्या भारावर पडला. डॉक्टरांनी महागडे ऑपरेशन सांगितल्यामुळे तो गावाकडे निघाला होता. परंतु प्रवासातच त्याला मृत्यूने गाठले अन् वडिलांचा मृतदेह पाहून दोन्ही मुलांनी टाहो फोडला. ही हृदयद्रावक घटना नागपूर स्थानकावर शनिवारी दुपारी १.२० वाजता घडली.
रवींद्र देवी राय (४१, रा. दुधारघाट, जिल्हा समस्तीपूर, बिहार) असे मृतकाचे नाव आहे. तो मजुरीच्या कामासाठी बंगळूरला गेला होता. तेथे काम सुरू असताना तो मानेच्या भारावर पडला. डॉक्टरांनी महागडे ऑपरेशन सांगितले. परंतु ऑपरेशनसाठी तेवढे पैसे नसल्यामुळे तो पत्नी आणि दोन मुलांना घेऊन आपल्या मूळगावी निघाला होता. रेल्वेगाडी क्रमांक ०२५७८ म्हैसूर-दरभंगा विशेष रेल्वेगाडीच्या कोच क्रमांक एस ८, बर्थ क्रमांक २१ वरून तो प्रवास करीत होता. परंतु नागपूर स्थानक येण्यापूर्वी त्याची प्रकृती बिघडली. गाडीतील टीटीईने याची सूचना रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांना दिली. परंतु नागपूर स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच त्याने अखेरचा श्वास घेतला. नागपूरला प्लॅटफार्म क्रमांक १ वर गाडी येताच रेल्वेच्या डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. वडील गेल्याचे पाहून दोन्ही मुलांनी टाहो फोडला. ही घटना पाहून स्थानकावर उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविला आहे. अधिक तपास पुरुषोत्तम लोखंडे करीत आहेत.
...............