नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)ची वेबसाईट आज पहाटे २.५६ वाजता अचानक बंद पडली. यामुळे लाखो प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. रेल्वे अधिकाऱ्यांचीही यामुळे झोपमोड झाली. तब्बल १०.२८ तासानंतर ही वेबसाईट पूर्ववत सुरू झाली.
अलिकडे रेल्वेचे तिकिट काढायचे असो की, रद्द करायचे प्रत्येक काम ऑनलाईन केले जाते. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी वेबसाईट सुरू केली असून, तिकिटांच्या बुकिंग, रिझर्वेशनपासून तो आपली गाडी कधी येणार, वेळेवर की लेट त्यासंबंधानेही वेबसाईटवर माहिती उपलब्ध असते. अशी ही वेबसाईट मंगळवारी पहाटे २.५६ वाजता अचानक निष्क्रीय झाली. त्यामुळे तिकिट काढणे किंवा रद्द होण्याची प्रक्रियाच पूर्ण होत नव्हती.
वारंवार प्रयत्न करूनही वेबसाईटवर कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याने लाखो प्रवासी हैरान -परेशान झाले. अनेकांनी आपापल्या गाव-शहरातील रेल्वेस्थानकांवर धाव घेणे सुरू केले. प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने तसेच वेबसाईट बंद पडल्याने पुढच्या काही तासांत गोंधळ उडू शकतो, हे ध्यानात आल्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी तडकाफडकी रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त तिकिट काउंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, नागपूर विभागातील सहा रेल्वे स्थानकांवर सात अतिरिक्त तिकिट काउंटर सुरू करण्यात आले. परिणामी गर्दी रोखण्यात यश आले आणि प्रवाशांनाही दिलासा मिळाला. मंगळवारी दुपारी १.२८ वाजता ही वेबसाईट पूर्ववत सुरू झाली.
नागपूर विभागात सुरू झालेले अतिरिक्त तिकिट काउंटर
मुख्य नागपूर रेल्वेस्थानक २ अतिरिक्त काऊंटर सुरू (एकूण ७ काउंटर)
अजनी रेल्वेस्थानक १ अतिरिक्त काऊंटर सुरू (एकूण ४ काउंटर)
वर्धा रेल्वेस्थानक १ अतिरिक्त काऊंटर सुरू (एकूण ३ काउंटर) बल्लारपूर रेल्वेस्थानक १ अतिरिक्त काऊंटर सुरू (एकूण २ काउंटर)
चंद्रपूर रेल्वेस्थानक १ अतिरिक्त काऊंटर सुरू (एकूण ३ काउंटर)
बैतुल रेल्वेस्थानक १ अतिरिक्त काऊंटर सुरू (एकूण ३ काउंटर)
रेल्वे अधिकारी म्हणतात...
लाखो प्रवाशांसह रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही झोप उडवून टाकणारा हा प्रकार कसा घडला. नेमकी वेबसाईट कशी बंद झाली, कशामुळे बंद झाली, ते कोणत्याही रेल्वे अधिकाऱ्याने अधिकृतपणे सांगितले नाही. मात्र, हा तांत्रिक बिघाड होता, एवढी जुजबी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून पत्रकारांना दिली.