नागपूर : नागपूरचा झपाट्याने विकास होत आहे. नागरिकांना विविध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. परंतु, दुसरीकडे मॉडेल मिल चाळ आणि गाडीखाना भागातील नागरिकांना मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांची होत असलेली गैरसोय पाहून महापालिकेने या भागातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
पक्की घरे बांधून देण्याची मागणी
मॉडेल मिल चाळ २००३ मध्ये बंद पडली. त्यावेळी येथील ३२० नागरिकांना पक्की घरे बांधून देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. परंतु, १८ वर्षांचा कालावधी लोटला तरीसुद्धा नागरिकांना पक्की घरे बांधून देण्यात आलेली नाहीत. या वस्तीतील घरे जीर्ण झाली असून, नागरिक जीव मुठीत घेऊन येथे राहत आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्यापूूर्वी शासनाने पक्की घरे बांधून देण्याची मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत.
पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती
मॉडेल मिल परिसरात नळलाईन आहे. परंतु, नागरिकांना कनेक्शन देण्यात आलेले नाही. येथील नागरिकांना पाण्यासाठी टँकरच्या भरवशावर अवलंबून राहावे लागत आहे. टँकर न आल्यास नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची पाळी येते. त्यामुळे महानगरपालिकेने नागरिकांना नळ कनेक्शन देण्याची मागणी होत आहे. या भागातील अंतर्गत रस्त्यांची अवस्थाही अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे या भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी आहे.
सफाईचा अभाव, सार्वजनिक शौचालयाची गरज
कचरा उचलण्यासाठी नियमित गाडी येत नसल्यामुळे मॉडेल मिल परिसरात नेहमीच कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. त्यामुळे दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव होतो. या भागात सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्याची मागणी नागरिक अनेक वर्षांपासून करीत आहेत. परंतु, सातत्याने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले.
गाडीखान्यात मोकाट जनावरे वाढली
गाडीखाना भागात कचरा उचलणारी गाडी नियमित येत नसल्यामुळे परिसरात कचरा साचलेला दिसतो. या भागात मोकाट जनावरे, कुत्र्यांची संख्या वाढली आहे. याबाबत अनेकदा महानगरपालिकेकडे तक्रारी करूनही काहीच पाऊल उचलण्यात आलेले नाही. गडरलाईनही नेहमीच चोक होत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. नागरिकांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यामुळे हे अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिक करीत आहेत. सार्वजनिक विहिरींची सफाई करण्यात येत नसल्यामुळे या विहिरीत कचरा साचलेला आहे. नळाला अतिशय कमी वेळ पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा
‘गाडीखाना परिसरात मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. महापालिकेने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.’
-नितीन शिर्के, नागरिक
नियमित सफाईची गरज
‘कचरा उचलणारी गाडी नियमित येत नाही. यामुळे जागोजागी कचरा साचलेला दिसतो. शिवाय परिसरातील सार्वजनिक विहिरींची सफाई करण्याची गरज आहे.’
-अनिल आदमने, नागरिक
कूपनलिका दुरुस्त कराव्यात
‘गाडीखाना परिसरात कूपनलिका आहेत. परंतु, त्या बंद असल्यामुळे नागरिकांना त्याचा लाभ होत नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. बंद असलेल्या कूपनलिका दुरुस्त करण्याची मागणी आहे.’
-दीपक जपूरकर, नागरिक
नळ कनेक्शन द्यावे
‘मॉडेल मिल चाळीच्या बाजूने मोठी पाण्याची पाईपलाईन गेली आहे. परंतु, नागरिकांना कनेक्शन देण्यात आलेले नसल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होते. टँकरही नियमित येत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, नागरिकांना नळ कनेक्शन देण्याची गरज आहे.’
- माधुरी वागधरे, महिला
नाल्यांच्या सफाईकडे लक्ष द्यावे
मॉडेल मिल चाळ परिसरात सांडपाण्याच्या नाल्यांची नियमित सफाई होत नाही. त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर साचून दुर्गंधी पसरते. अंतर्गत रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे. महापालिकेने या भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे.’
- नितीन नगरारे, नागरिक
.............