लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकल परिसरातील स्विमिंग पूलमध्ये युवा अभियंत्याचा बुडाल्यामुळे मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेला १५ दिवस लोटले आहेत. या दिवसात पोलिसांच्या तपासाची गती संथ आहे. पोलीस कोणत्याही निष्कर्षावर अद्यापही पोहोचले नाहीत. प्रशिक्षक, गार्डच्या बेजबादारपणाने स्विमिंग पूलमध्ये मुलगा बुडाला असून या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी वडिलांनी केली आहे.मृत नवीन श्रीराव (१९) हा रेणुका मातानगर, हुडकेश्वर येथील रहिवासी होता. त्याचे वडील छगनराव श्रीराव हे चौकशी करण्याच्या मागणीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात निरंतर फेऱ्या मारीत आहेत. नवीन हा पोहणे शिकत होता. पण मेडिकल परिसरातील पुलावर पोहणे शिकणाऱ्या युवकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही व्यवस्था पुरविण्यात आली नव्हती. मुले पोहणे शिकताना प्रशिक्षक आणि सुरक्षा रक्षक काय करीत होते, असा त्यांचा सवाल आहे. पूलमध्ये पोहणे शिकण्यास असलेल्या मुलाला बुडत असताना ड्युटीवर तैनात प्रशिक्षक आणि रक्षकांनी त्याला वाचविले का नाही? त्यांच्या बेजबाबदारपणामुळे मुलाचा जीव गेला आहे. स्विमिंग पूल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा नाही. ही गंभीर बाब असल्याचा आरोप छगन श्रीराव यांनी केला आहे. नवीनची बॅचची वेळ रात्री ९ ते १० होती. त्यानंतरही त्याला सायंकाळी ६ ते ७ च्या बॅचमध्ये प्रवेश का देण्यात आला? यामुळे स्विमिंग पूल संचालक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येते.१५ दिवसांपूर्वी बुधवार, २४ एप्रिलला झालेल्या घटनेनंतर पोलिसांतर्फे केवळ पूल कंत्राटदार, सुरक्षा गार्ड आणि अन्यचे बयाण घेतल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे स्विमिंग पूल सुरक्षा समितीच्या तपासणीत काहीही तथ्य बाहेर आले नाही.हैदराबाद येथे झाली होती नियुक्तीनवीन इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. त्याला हैदराबाद येथील एका कंपनीत नोकरी मिळाली होती. काही दिवसानंतर तो कंपनीत रुजू होणार होता. पण या दरम्यान दुर्दैवी घटनेत त्याचा जीव गेला.