लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रो नागपूर प्रकल्पात कार्य करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महामेट्रोतर्फे वर्धा मार्गावरील उज्ज्वलनगर मेट्रो स्टेशनजवळ सेफ्टी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. आपात्कालीन परिस्थितीत सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर त्यात अडकलेल्या व्यक्तींच्या बचावाकरिता करण्यात येणाऱ्या उपाययोजना सांगण्यात आल्या. बचाव प्रक्रियेमध्ये बचाव तंत्र आणि यंत्रणांचा कसा वापर करावा? अचानक घडलेल्या घटनेला कारणीभूत बाबींचे निरीक्षण करून आवश्यक नोंदी करणे का आवश्यक आहे? याचे महत्त्व पटवून देत कार्यस्थळी उद्भवणाऱ्या धोक्यासंबंधी सविस्तर माहिती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आली.या मॉक ड्रिलअंतर्गत एक कर्मचारी तब्बल ३० फुटापेक्षा जास्त उंचीवर अडकला होता. त्याच्या बचावासाठी नाट्यमय पद्धतीने इतर कर्मचारी धावपळ करीत आवश्यक उपकरणे गोळा करीत होते. त्यानंतर नियोजित पद्धतीने उंचीवर अडकलेल्या कर्मचाऱ्याला वाचविण्यात आले. त्याला लगेचच आवश्यक त्या सर्व सोईसुविधा पुरविण्यात आल्या. कर्मचाऱ्याला सुरक्षितपणे वाचविल्यानंतरच आवश्यकतेनुसार वैद्यकीय तपासणी करून घटनेतील परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात आले.महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे प्रकल्पांच्या विविध कार्यस्थळांवर मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात येते. एका मॉक ड्रिलमध्ये किमान २० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. आतापर्यंत १८० पेक्षा जास्त मॉक ड्रिलचे आयोजन महामेट्रोतर्फे करण्यात आले असून, सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. महामेट्रोतर्फे वेळोवेळी अशाप्रकारे मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात येते. जमिनीच्या एका विशिष्ट उंचीवर दोराला धरून काम करणाऱ्या कामगारांपासून मॉक ड्रिलची सुरुवात होते.आंतरराष्ट्रीय मानकानुसार उंचीवर काम करताना जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी साधारणत: ३० मिनिटाचा कालावधी लागतो. मात्र, महामेट्रोने मॉक ड्रिलच्या माध्यमाने केवळ ११ मिनिटात कशाप्रकारे या कर्मचाऱ्यांना वाचविता येऊ शकते, हे सिद्ध करून दाखविले. मॉक ड्रिलदरम्यान नागपूर वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वाहतूक अधिकाऱ्यांनी काही आवश्यक व महत्त्वाच्या घटकांची जाणीव उपस्थितांना करून दिली.