काटाेल : जिल्हा परिषद व पंचायत समिती पाेटनिवडणूक २०२१ च्या पार्श्वभूमीवर काटाेल येथे रविवारी (दि.४) मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पहिल्या सत्रातील प्रशिक्षण पार पडले. स्थानिक नबीरा महाविद्यालय येथे झालेल्या या प्रशिक्षणाला १४० मतदान केंद्राध्यक्षांपैकी १२२ प्रशिक्षणार्थी हजर हाेते. तर मतदान अधिकारी ४२० पैकी ३८८ प्रशिक्षणार्थी उपस्थित हाेते.
काटाेल तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती पाेटनिवडणुकीसाठी ११५ मतदान केंद्रावर १९ जुलै राेजी मतदान हाेणार आहे. या अनुषंगाने मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. दुसऱ्या सत्रातील प्रशिक्षण ११ जुलै राेजी याच नबीरा महाविद्यालयात आयाेजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. प्रथम सत्रातील प्रशिक्षणात मतदान अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन त्यांच्या कार्याचे वाटप करण्यात आले. या प्रशिक्षणाला उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार अजय चरडे, नायब तहसीलदार नीलेश कदम, एस. एम. टिपरे, खंडविकास अधिकारी संजय पाटील, गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी व प्रशिक्षणार्थी मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी उपस्थित हाेते.