लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : पूर आपत्तीसाठी आणि विपरीत परिस्थितीचा सामना करण्याकरिता कामठी येथे शाेध व बचाव पथकाचे प्रशिक्षण पार पडले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे कामठी तालुक्यासाठी बाेट प्राप्त झाली असून, साेनेगाव राजा येथील कन्हान नदीत आपत्ती व्यवस्थापनाबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
मागील वर्षी तालुक्यातील गावांना पुराचा धाेका निर्माण झाला हाेता. बिडबिना व साेनेगाव राजा गावाला पुराने वेढले हाेते. त्यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने बाेटीतून रेस्क्यू करीत नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले हाेते. यावर्षीदेखील सततच्या पावसामुळे पूरपरिस्थितीची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी खबरदारी व पूर्व उपाययाेजना म्हणून कामठी तालुका शाेध व बचाव पथकाला बुधवारी एसडीआरएफमार्फत प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे बोट प्राप्त झाली असून, या बाेटीचा उपयाेग शोध व बचाव पथकाला नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी कसा करता येईल, याबाबत महसूल व पथकातील कर्मचाऱ्यांनी सराव केला. तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मार्गदर्शनात सोनेगाव राजा येथे कन्हान नदीत कर्मचाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गिरविले. यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र माळी, मंडळ अधिकारी महेंद्र कांबळे, तलाठी युवराज चौधरी आदी उपस्थित हाेते.