नागपूर : दक्षिणेतून येणाऱ्या रेल्वेगाड्या प्रवाशांना अक्षरश: घाम फोडत आहेत. गर्मी आणि उकाड्यात नागपूर रेल्वे स्थानकावर तास-न-तास या गाड्यांची प्रतिक्षा करावी लागत असल्याने प्रवाशी चांगलेच वैतागले आहेत.
बंगळुरू, म्हैसूर, चेन्नईकडून येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या विलंबाने नागपूर स्थानकावर पोहचत आहेत. या गाड्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांची रेल्वेस्थानकावर सारखी गर्दी वाढत आहे. शनिवारी हजारो प्रवासी उकाड्याचा त्रास सहन करत रेल्वेगाडीची वाट बघत होते. आता येईल मग येईल, असे करता करता म्हैसूर दरभंगा एक्सप्रेस तब्बल तीन तास उशिराने नागपूर स्थानकावर पोहचली.
एर्नाकुलम-बरौनी राप्तीसागर एक्सप्रेसही तीन तास विलंबाने आली. चेन्नई-नवी दिल्ली तामिळनाडू एक्सप्रेस दोन तास, विशाखापट्टनम - नवी दिल्ली एपी एक्सप्रेस दोन तास, बंगळुरू निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस एक तास, तर यशवंतपूर-निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्सप्रेस दोन तास विलंबाने नागपूरात पोहचली.
यामुळे या गाड्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांचा अक्षरश: घाम निघाला. दरम्यान, दक्षिणेकडून येणाऱ्या रेल्वेगाड्या एवढ्या विलंबाने का धावत आहेत, त्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.