लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळी अधिवेशन शुक्रवारी आटोपल्यामुळे अधिवेशनासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी परतीच्या प्रवासासाठी रेल्वेस्थानकावर एकच गर्दी केली. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस आणि नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस या गाड्या फुल्ल झाल्याचे चित्र होते.शुक्रवारी पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे अधिवेशन आटोपताच पोलीस, कर्मचाऱ्यांनी मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये एकच गर्दी केली. मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यात गर्दी होऊन त्या फुल्ल झाल्या होत्या. नेते, आमदार आणि कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. पर्यावरण मंत्री रामदास कदम हे विदर्भ एक्स्प्रेसने रवाना झाले. तर जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक आमदारांनी दुरांतो एक्स्प्रेसने प्रवास केला. यात प्रवाशांच्या सुविधेसाठी विदर्भ एक्स्प्रेसला एक एसी २ चा अतिरिक्त कोच जोडण्यात आला होता. विदर्भ एक्स्प्रेसमध्ये जवळपास सर्वच कोचमध्ये १५० च्या वर वेटिंग पाहावयास मिळाली. सेवाग्राम एक्स्प्रेसमध्येही १७० च्या जवळपास वेटिंग असल्यामुळे या गाडीलाही रेल्वे प्रशासनाच्या वतीने एक एसी २ चा अतिरिक्त कोच जोडण्यात आला. दुरांतो एक्स्प्रेसच्या एसी २ कोचमध्ये १२० वेटिंग, एसी थ्रीमध्ये २०० आणि स्लिपरक्लासमध्ये १५० वेटिंगची स्थिती होती. अनेक जण वेटिंगचे तिकीट हातात पडल्यामुळे गाडी प्लॅटफार्मवर लागल्यानंतर बर्थ मिळविण्यासाठी टीसीशी संपर्क साधताना दिसले. तर बर्थ उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना विना बर्थ प्रवास करण्याची पाळी आली.नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसमध्ये दोन अतिरिक्त स्लिपर कोचप्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाडी क्रमांक ११४०३/११४०४ नागपूर-कोल्हापूर (छत्रपती शाहू महाराज टर्मिनस) एक्स्प्रेसमध्ये स्लिपर क्लास कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेगाडी क्रमांक ११४०३ नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसमध्ये २१ जुलैला तर रेल्वेगाडी क्रमांक ११४०४ कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेसमध्ये २३ जुलैला दोन स्लिपर क्लास कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी या अतिरिक्त कोचचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.