नागपूर : होळीचा सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करण्यासाठी महाराष्ट्रात काम करणारे इतर राज्यातील नागरिक दरवर्षी आपल्या शहरात परत जातात. यामुळे चारही दिशांच्या रेल्वेगाड्यात गर्दी होते. नागरिकांना कन्फर्म तिकीट या काळात मिळत नाही. परंतु कोरोनामुळे मागील वर्षासारखी या वर्षी होळीला रेल्वेगाड्यातील गर्दी कमी झाली आहे. केवळ उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या रेल्वेगाड्यातच अधिक प्रवासी दिसत आहेत. इतर मार्गावरील रेल्वेगाड्यात बर्थ खाली असल्यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत आहेत. याबाबत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे जनसंपर्क अधिकारी एस. जी. राव म्हणाले, उत्तरप्रदेश, बिहारच्या रेल्वेगाड्यात दरवर्षीप्रमाणे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. परंतु इतर मार्गावरील गाड्यात कमी प्रवासी आहेत. मुंबई, पुण्याच्या रेल्वेगाड्यात होळीला कमी गर्दी असते. नागपूरसह विदर्भातील जे नागरिक पुणे, मुंबईत काम करतात किंवा शिकण्यासाठी गेलेले आहेत, ते नागपूरला परत येतात. त्यामुळे तेथून येणाऱ्या गाड्यात गर्दी राहते. येथून मुंबई, पुण्याला जाणाऱ्या गाड्यात होळीनंतर गर्दी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेश, बिहारच्या रेल्वेगाड्यात होळीमुळे गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 4:07 AM