अभय लांजेवार
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : ब्रिटिशांच्या काळातील ‘शंकुतला’ची झुकझुक थांबल्यानंतर आणि डिसेंबर २०२० ला नागपूर-नागभीड ब्रॉडगेजचे काम सुरू होताच, नागरिकांमध्ये मोठी रेल्वेलाइन आणि अगिनगाडीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यातच उमरेड-शिवापूर मार्गालगत ५ ते ७ मीटर खोल खोदकाम केल्याने उमरेडच्या काही परिसरातून रेल्वे पुलाखालून जाणार याबाबतही कमालीची चर्चा परिसरात होती. आता या कामात अंशत: बदल झाला असून, या परिसरातून रेल्वे पुलाखालून (बोगद्यातून) नव्हे तर पुलावरून धावणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
नागपूर-नागभीड या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्यासाठी सुमारे १५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. २१ महिन्यांच्या कालावधीत काम पूर्ण होणार अशी अधिसूचना डिसेंबर २०२०ला निर्गमित करण्यात आली होती. महाराष्ट्र रेल्वे इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून हे काम सुरू करण्यात आले. असे असले तरी एकूणच कामाची परिस्थिती बघता आणि तक्रारीची बाब लक्षात घेता ठरावीक कालावधीत रेल्वेचे काम पूर्णत्वास येणार नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. विकासकामात खोळंबा निर्माण झाल्याने आणि नागरिकांची गैरसोय होणार असल्याने याप्रकरणी आता चांगलाच संताप व्यक्त होत आहे.
भिवापूरलगत आंभोरा जुन्या मार्गालगत तसेच कारगाव रेल्वे क्रॉसिंग परिसरात पुलावरून रेल्वे जाणार असल्याचे निश्चित झाले होते. यात कोणताही बदल नाही. सोबतच उमरेड-शिवापूर मार्गालगत बोगद्यातून रेल्वे धावणार होती. परिसरात मोठे नाले, तलाव असल्याने या निर्णयात बदल करण्यात आला. आता या परिसरात पूल उभारला जाणार आहे.
.....
लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय?
बऱ्याच वर्षांपासून ब्रॉडगेज रेल्वेची मागणी होती. यासाठी निवेदने, चर्चा, उपोषणे, रेल रोको, आंदोलने झालीत. वर्तमानपत्रांनीही दखल घेत समस्येला वाचा फोडली. निधी मंजूर होत कामालाही प्रारंभ झाला. आता अवैध वृक्षतोड प्रकरणावरून वन्यजीव-वनविभागाने कागदी घोडे नाचविले. कोरोनासदृश परिस्थिती असल्यामुळे नागरिक गप्प आहेत. पूर्ववत स्थिती आल्यास नागरिकांची ओरड नक्की होणार. कमी रकमेत, झटपट प्रवास गोरगरीब-सर्वसामान्यांसह साऱ्यांनाच परवडणारा राहील. शिवाय, व्यापारी-उद्योजकांसाठीही रेल्वे सुखदायी ठरणार आहे. सद्यस्थितीत रेल्वेच्या थांबलेल्या कामाकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय, प्रकरण गंभीरतेने घेतील काय, असा सवाल विचारला जात आहे.