लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर विभागात प्रति तास १३० किलोमीटर वेगाने रेल्वेगाड्या चालविण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी काही कामे करावयाची आहेत. विभागाला असलेल्या गरजांबाबत झोन मुख्यालयाला सूचना देण्यात आली आहे, असे प्रतिपादन मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या ‘डीआरएम’ रिचा खरे यांनी केले. हे काम पूर्ण झाल्यानंतर आरडीएसओ प्रति तास १३० किलोमीटरच्या वेगाने ट्रायल घेणार असून काम पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘डीआरएम’ रिचा खरे म्हणाल्या, वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशनच्या प्रोजेक्टसाठी मध्य रेल्वे आणि आयआरएसडीसीकडून कराराची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रेल्वेगाड्यात बेड रोलचा पुरवठा बंद असल्यामुळे अजनीतील मॅकेनाईज्ड लॉंड्रीमध्ये काम सुरू झालेले नाही. या लॉंड्रीचा दुसऱ्या पद्धतीने वापर करण्याबाबत रेल्वे बोर्डाशी बोलणे सुरू आहे. बोर्डाने याबाबत अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. निधीचा तुटवडा असल्यामुळे प्रवासी सुविधांशी संबंधित विकासकामे प्रभावित होत आहेत. परंतु रेल्वे परिचालनाच्या दृष्टीने आवश्यक सुरक्षेशी संबंधित कामे थांबविण्यात आलेली नाहीत. गड्डीगोदाम रेल्वे पुलावर सुरू असलेले देखभालीचे काम मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत चालणार आहे. तर रेल्वे गार्डसह इतर रनिंग स्टाफला सॅनिटायझर किट देण्यात आली आहे. तसेच लॉबीतही सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. अशा स्थितीत ब्रेकव्हॅनमध्ये गार्डला कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका नाही. आपल्या कार्यकाळात रेल्वे सुरक्षा, डिजिटलायझेशन, प्रवासी सुविधा आणि उत्पन्न वाढविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक अनुप कुमार सतपथी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, वरिष्ठ विभागीय अभियंता पवन पाटील, जनसंपर्क अधिकारी एस. जी. राव उपस्थित होते.
रेल्वेने पाठविला ६ हजार टन संत्रा
‘डीआरएम’ खरे म्हणाल्या, कोरोनाच्या काळात विभागाने उत्पन्नाचे नवे स्रोत शोधले. आता संत्रा, कापूस, फ्लायअॅश, ट्रॅक्टर्स रेल्वेने वाहतूक करण्यात येत आहे. आतापर्यंत विभागाने २३ मालगाड्यांच्या माध्यमातून ६ हजार टन संत्रा दिल्ली आणि शालीमारला पाठविला. डिसेंबर अखेरपर्यंत विभागाने २ हजार कोटी उत्पन्न मिळविले आहे. कोरोनामुळे हे उत्पन्न उद्देशापेक्षा ६०० कोटी रुपये कमी आहे. विभागाने १६ श्रमिक स्पेशल गाड्या चालवून ९ लाख प्रवाशांना पाठविले आहे. मालगाड्यांचा वेग २१ किलोमीटरवरून ४० किलोमीटर वाढविण्यात आला आहे.
अजनी वन वाचविणे महामेट्रो, एनएचएआयची जबाबदारी
‘डीआरएम’ रिचा खरे यांनी सांगितले की, अजनीत प्रस्तावित इंटरमॉडेल रेल्वे स्टेशनच्या प्रकल्पासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने केवळ आपली जमीन दिली आहे. या प्रकल्पाला साकारताना अजनी रेल्वे परिसरातील वृक्षांना वाचविण्याची जबाबदारी महामेट्रो आणि एनएचएआयची आहे. त्यांच्यातच या प्रकल्पाबाबत करार झाला आहे. तेच याबाबत योग्य पाऊल उचलणार आहेत. मध्य रेल्वेने या प्रकल्पासाठी अजनीतील ४४ हेक्टर जमीन दिल्याचे त्यांनी सांगितले.