नागपूरच्या मोमिनपुऱ्यातील बकरामंडी एपीएमसीत स्थानांतरित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 06:44 PM2020-05-26T18:44:11+5:302020-05-26T18:52:33+5:30
मोमिनपुऱ्यातील बकरामंडी कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरात तात्काळ स्थानांतरित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी महानगरपालिका आयुक्तांना दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोमिनपुऱ्यातील बकरामंडी कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरात तात्काळ स्थानांतरित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने मंगळवारी महानगरपालिका आयुक्तांना दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
महानगरपालिका उपायुक्तांनी ४ मे २०२० रोजी वादग्रस्त आदेश जारी करून ही बकरामंडी वाठोडा येथे स्थानांतरित केली होती. त्याविरुद्ध उमेश उतखेडे, कृष्णा मस्के व दिनेश येवले यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. मोमिनपुरा येथे कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महानगरपालिका आयुक्तांनी १२ एप्रिल २०२० रोजीच्या आदेशाद्वारे मोमिनपुऱ्याला प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे. परिणामी, या क्षेत्रातील नागरिक बाहेर जाऊ शकत नाहीत व बाहेरचे नागरिक या क्षेत्रात प्रवेश करू शकत नाहीत. असे असताना मोमिनपुऱ्यातील बकरामंडी वाठोड्यात स्थानांतरित करण्यात आली. मनपा उपायुक्तांचा आदेश मनपा आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली करणारा आहे. वाठोड्यातील जागा क्वारंटाईन सेंटर असलेल्या सिम्बॉयसिस कॉलेजजवळ आहे. बकरामंडी वाठोड्यात स्थानांतरित केल्यास या भागात कोरोना संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता वाठोड्यातील नागरिकांना दिलासा देऊन याचिका निकाली काढली. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. कार्तिक शुकुल यांनी कामकाज पाहिले.
एपीएमसी बकरामंडीसाठी तयार
एपीएमसीने या प्रकरणात मध्यस्थी अर्ज दाखल करून ही बकरामंडी त्यांच्या परिसरात स्थानांतरित करून घेण्याची तयारी दर्शवली होती. तसेच, नियमानुसार बकरामंडी स्थानांतरित करण्याचा अधिकार एपीएमसीला आहे. महानगरपालिका यासंदर्भात आदेश देऊ शकत नाही असे अर्जात नमूद करण्यात आले होते. उच्च न्यायालयाने बकरामंडी एपीएमसी परिसरात स्थानांतरित करताना हे मुद्देही विचारात घेतले.