नागपूर : पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त नवीन शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी जिल्ह्यांतर्गत कार्यरत शिक्षकांच्या बदल्या न झाल्याचा वाद सुरू होता. अखेर हा वाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात पोहचला. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या सीईओ सौम्या शर्मा यांनी बोलावलेल्या शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत नवीन शिक्षकांच्या पदस्थापनेपूर्वी कार्यरत शिक्षकांच्या बदल्या करण्याचा तोडगा निघाला.
पवित्र पोर्टलद्वारे जिल्हा परिषदेत १२० शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिक्षकांना पदस्थापना देण्यापुर्वी जिल्ह्यात सध्या कार्यरत शिक्षकांच्या बदल्या करण्यात याव्यात अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. परंतू जि.प.प्रशासनाला ही मागणी मान्य नव्हती. त्यामुळे शेवटी हा वाद उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहचला होता.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी जिल्हांतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी केली. त्यांनी मागणीची दखल घेत कार्यरत शिक्षकांच्या बदल्या करण्याबाबत सीईओंना निर्देश दिले. त्यामुळे पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी कार्यरत शिक्षकांच्या बदलीचा मार्ग मोकळा झाला.
सीईओ शर्मा यांनी शिक्षण विभागास अहवाल तयार करण्याचे तसेच इच्छूक व पात्र शिक्षकांचे अर्ज मागविण्याची निर्देश दिल्याचे लिलाधर ठाकरे यांनी सांगितले.शिष्टमंडळात निळकंठ लोहकरे , राजू बोकडे , सुरेश श्रीखंडे , प्रकाश सव्वालाखे , धर्मेंद्र गिरडकर , दिगांबर ठाकरे , विजय उमक , सुरेश भोसकर,अशोक बांते , दामोधर कोपरकर , योगेश राऊत आदी सहभागी होते.