नागपूर: मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) तुषारकांत पांडे यांचे संभलपूरला स्थानांतरण झाले आहे. या पदाची जबाबदारी आता गुंटकल येथील मनीष अग्रवाल सांभाळणार आहेत.
देशातील रेल्वे प्रशासनाचा एक अत्यंत महत्वाचा विभाग म्हणून नागपूर रेल्वे विभागाचे महत्व आहे. नागपूरचा विभाग मध्य आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेशी जुळला असून येथे दोन्ही विभागांची स्वतंत्र कार्यालये आहेत. कोट्यवधींच्या प्रवासी उत्पन्नासोबतच या दोन विभागाला कोळसा, वाहने, सिमेंट आणि लोह वाहतुकीतून कोट्यवधींचा महसुल मिळतो.
१० महिन्यांपूर्वी तुषारकांत पांडे यांनी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मितभाषी आणि साैजन्यशिल अधिकारी म्हणून पांडे ओळखले जायचे. त्यांनी आपल्या कार्यकाळात नागपूर तसेच विभागातील अनेक रेल्वे स्थानकांवर महत्वाची विकासकामे करवून घेतली. नागपूर स्थानकावरील पार्किंग आणि ऑन कॉल टॅक्सी हे दोन अत्यंत महत्वाचे विषय मार्गी लावले. साधारणत: या पदावरील व्यक्तीचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो. मात्र, अवघ्या १० महिन्यातच त्यांची बदली झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
गेल्या महिनाभरात रेल्वे प्रशासनाशी संबंधित घडलेल्या काही घटनाही त्यामुळे चर्चेला आल्या आहेत. ५ जानेवारीला गार्ड (ट्रेन मॅनेजर) सुनील नितनवरे यांचे रेल्वे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. यावेळी संतप्त झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणाचा आरोप करून जोरदार आंदोलन केले. त्यामुळे काही वेळेसाठी येथील रेल्वेगाड्यांच्या संचालनावर प्रभाव पडला. तत्पूर्वी किन्नराच्या एका टोळीने पुणे हटिया रेल्वेगाडीत दरोडा घातला.
त्याचवेळी कंत्राटदाराकडून पार्किंगच्या नावाखाली वाहनधारकाची लुट केली जात असल्याची तक्रार प्रवासी संघटनेने केली. या प्रकरणांची शिर्षस्थ पातळीवर तक्रारवजा चर्चा झाली असताना सोमवारी मध्यरात्री पाटलीपूत्र एक्सप्रेसमध्ये चिमुकलीवर कोच अटेंडन्सकडून बलात्काराचा प्रयत्न झाला. त्यामुळे रेल्वेच्या नागपूर विभागाकडे चोहोबाजूने लक्ष वेधले गेले. या पार्श्वभूमीवर, आज मंगळवारी विभागीय व्यवस्थापक पांडे यांची संबलपूर विभागाचे व्यवस्थापक म्हणून बदली झाल्याचे तर, ही जबाबदारी आता आंध्र तेलंगणातील गुंटकल येथील मनीष अग्रवाल सांभाळणार वृत्त नागपुरात आले. या संबंधाने रेल्वेच्या अन्य अधिकाऱ्यांकडे चर्चा केली असता त्यांनी 'बदलीचा हा प्रकार रुटीन' असल्याचे सांगितले.