कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे पहिले तीन टप्पे आटोपले असून, निवडणूक आयोगाकडून करण्यात येत असलेल्या बदल्यांवरूनदेखील राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. बदल्यांचे हे सत्र सुरूच असून आयोगाने कोलकात्यातील आठ विधानसभा क्षेत्रातील निवडणूक अधिकाऱ्यांना हटविले आहे. या मतदारसंघांमध्ये २६ एप्रिल व २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
चौरंगी, एन्टाली, भवानीपूर, बेलियाघाट, जोडासांको, शामपुकूर, काशीपूर-बेलगछिया व कोलकाता पोर्ट या विधानसभा मतदारसंघात नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व बदल्या एका नियमित प्रक्रियेंतर्गत झाल्या आहेत. हे अधिकारी तीन वर्षांपासून एकाच ठिकाणी होते, निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी मोठी भूमिका पार पाडतात. या अधिकाऱ्यांच्या बदल्या नियमानुसारच करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी आरिज आफताब यांनी दिली. या अधिकाऱ्यांविरोधात सत्तारूढ तृणमूल काँग्रेसची बाजू घेण्यात येत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.