दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बदली झाली की दुसऱ्या शहरात आपले सामान घेऊन जाण्यासाठी विविध शासकीय, खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धडपड करावी लागत होती. खासगी माल वाहतूकदारांनी सांगितलेले अव्वाच्या सव्वा भाडे त्यांना मोजावे लागत होते. परंतु आता एसटी महामंडळ वाजवी दर घेऊन माल वाहतुकीच्या क्षेत्रात उतरल्यामुळे मालाची वाहतुक करणारे आणि बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची चिंता दूर झाली आहे. माल वाहतुकीद्वारे महिनाभरात एसटी महामंडळाने राज्य स्तरावर ६२ लाख ८७ हजार ३०३ रुपये तर नागपूर विभागात १ लाख २१ हजार १६७ रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
एसटी महामंडळाने माल वाहतुकीच्या क्षेत्रात खासगी वाहतूकदारांची असलेली मक्तेदारी संपुष्टात आणली आहे. एसटी महामंडळाने २२ मेपासून माल वाहतुकीच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. सुरुवातीला एसटीने २८ रुपये प्रतिकिलोमीटर आणि १८ टक्के जीएसटी असे दर आकारले होते. परंतु त्यानंतर या दरात सुधारणा करून ३५ रुपये प्रतिकिलोमीटर आणि मालाच्या मूल्याचे ०.२५ टक्के असे दर आकारून जीएसटीमधून सुटका केली. कमी किलोमीटर अंतरावर माल वाहतूक करावयाची असल्यास एसटीच्या वतीने केवळ ३ हजार रुपये आकारण्यात येत आहेत. इतक्या कमी दरात सर्वसामान्यांना वाहतूक करणे सोयीचे झाल्यामुळे एसटी महामंडळाच्या माल वाहतुकीला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
२२ मेपासून १८ जूनदरम्यान महाराष्ट्रात १ लाख ६१ हजार ८०५ किलोमीटर माल वाहतूक करून ६२ लाख ८७ हजार ३०३ रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर नागपूर विभागात १९ फेºयांच्या माध्यमातून २८८१ किलोमीटर माल वाहतूक करण्यात आली. यातून विभागाला १ लाख २१ हजार १६७ रुपये उत्पन्न मिळाले. माल वाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या नागपूर, काटोल, उमरेड, सावनेर, रामटेक येथे नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. अगदी वेळेवर माल वाहतुकीसाठी एसटीच्या ट्रकची मागणी केल्यास तो सहज उपलब्ध होणार आहे. सध्या नागपूर विभागात ६ ट्रकच्या माध्यमातून माल वाहतूक करण्यात येत आहे. आगामी दोन दिवसात १२ ट्रक उपलब्ध होणार आहेत. एसटीच्या वतीने कमी दरात माल वाहतूक करण्यात येत असून याचा धसका खासगी माल वाहतूकदारांनी घेतला आहे. माल वाहतुकीच्या क्षेत्रात एसटीने पदार्पण केल्यामुळे आणि एसटीचे दर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे असल्यामुळे माल वाहतूक करणाऱ्यांची पावले एसटीच्या कार्यालयाकडे वळत आहेत.
विविध संस्था, कंपन्यांशी करणार करारअनेक खासगी संस्था, विविध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना १२ महिने मालाची वाहतूक करावी लागते. यापूर्वी ते खासगी माल वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांशी संपर्क साधत होते. परंतु आता एसटीने कमी दरात माल वाहतुकीची सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात विविध संस्था, कंपन्यांनी मागणी केल्यास त्यांच्याशी वर्षभरासाठी करार करण्याची तयारी महामंडळाने केली आहे.
बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना एसटीचा आधारमागील १५ दिवसात दोन बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाशी संपर्क साधला. खासगी वाहतूकदारांनी सांगितलेल्या भाड्याच्या तुलनेत त्यांना एसटीचे दर अतिशय कमी असल्याचे कळाले. त्यामुळे त्यांनी आपले घरगुती सामान नेण्यासाठी एसटीचा पर्याय निवडला. यातील एका कर्मचाऱ्यांचे सामान खामगावला आणि दुसऱ्या कर्मचाऱ्याचे सामान नागपूरमधून नागपूर शहरातच सुरक्षित पोहचविण्यात आले.