लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वनविभागातील सत्तावीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज दुपारी निघाले आहेत. यात प्रधान मुख्य वनसंरक्षक, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षक, वनसंरक्षक आणि उपवनसंरक्षक या पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) प्रवीण श्रीवास्तव यांची प्रशासकीय कारणावरून राज्याच्या जैवविविधता मंडळावर सदस्य सचिव म्हणून बदली झाली आहे. तर या पदावरील अधिकारी जीत सिंग यांना प्रवीण श्रीवास्तव यांच्या खुर्चीवर बसवण्यात आले आहे. महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक या रिक्त पदावर एम. श्रीनिवासा राव यांची बदली करण्यात आली आहे. ते एफडीसीएम मध्ये मुख्य महाव्यवस्थापक (नियोजन) या पदावर होते. राव यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांची बदली करण्यात आली आहे. अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांची अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) या पदावर बदली करण्यात आली आहे. ठाणे येथील मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे यांना संजीव गौड यांच्या रिक्त पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.
ठाणे येथील वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी या आता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षक असतील. यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांना त्याच पदावर ठाणे येथे पाठविण्यात आले आहे.यासोबतच राज्यातील वनसंरक्षक पदावरील सहा अधिकाऱ्यांच्या तर उपवनसंरक्षक पदावरील तेरा अधिकाऱ्यांच्या देखील प्रशासकीय कारणावरून बदल्या करण्यात आल्या आहेत.