लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : शहरातील अंबाळा घाट हा स्मशानभूमीचा परिसर काही वर्षांपासून बकाल झाला हाेता. मात्र, शहरातील सृष्टिसौंदर्य परिवाराच्या सदस्यांनी या भागाचा कायापालट करण्याचा निर्णय घेत त्यावर अंमलबजावणी केली. हल्ली या परिसराचे साैंदर्यीकरण करण्यात येत असल्याने हा भाग कात टाकत आहे.
सृष्टिसौंदर्य परिवारात रामटेक शहरातील व्यावसायिक व तरुणांचा समावेश आहे. या परिवाराच्या सदस्यांनी अंबाळा घाटावर असलेल्या बैठक हॉलची दुरुस्ती करून आतून बाहेरून सुंदर रंगरंगाेटी केली. या घाटावर अंत्यसंस्कारासाठी येणारी मंडळी याच हाॅलमध्ये बसतात व विश्रांती घेतात. त्या परिसराची साफसफाई करून तिथे चिंच, पिंपळ, वड, जांभूळ, आवळा अशा विविध प्रकारच्या २०० राेपट्यांची लागवड करीत त्यांचे याेग्य संगाेपन व देखभाल करण्याची जबाबदारीही स्वीकारली.
ही सर्व कामे त्यांनी स्वखर्चातून व श्रमदानातून केली आहेत. या कार्यात त्यांना बच्चे कंपनीचीही माेठी मदत मिळाली. आपण या ठिकाणी आठवड्यातील तीन दिवस दाेन तास श्रमदान करीत असल्याची माहिती सृष्टिसौंदर्य परिवाराच्या सदस्यांनी दिली. हाॅलमध्ये नागपूरच्या महेश आर्टकडून आकर्षक चित्रे काढून घेतली. या कार्यात सुमित कोठारी, ऋषिकेष किंमतकर, वेदप्रकाश मोकदम, हेमंत रेवस्कर, डॉ. बापू सेलोकर, नामदेव राठोड, राजेश बागडे, डॉ. राजेंद्र बरबटे, विनोद शेंडे, भूषण देशमुख यांच्यासह इतर सदस्यांचा व लहान मुला-मुलींचा माेटा वाटा राहिला आहे.