लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांना कृषी पंपाद्वारे अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या एचव्हीडीएस (हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम) योजनेत मोठी त्रुटी समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात ट्रान्सफार्मर खराब झाल्यावर ते दुरुस्त करण्यासाठी जवळपास १५-१५ दिवस लागत आहे. दुसरीकडे कृषी पंपाच्या पारंपरिक कनेक्शनसााठी लावण्यात आलेले ट्रान्सफार्मर बिघडण्याचे प्रमाणही ३.५ टक्केवर पोहोचले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आपल्या शेताला पाणी देऊ शकत नाही. पुरेसे पाणी असूनही शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.
जिल्ह्यात कृषी पंपाच्या पारंपरिक कनेक्शनची संख्या जवळपास ८५ हजार इतकी आहे. त्यांना वीज पुरवठा करण्यासाठी ७००० ट्रान्सफार्मर लागले आहेत. जर ट्रान्सफार्मर खराब झाला तर ते दुरुस्त करणे कठीण असते. महावितरणच म्हणणे आहे की, शेतकरी अनेकदा आपल्या शेतात डीपी लावू देत नाही. नागपूर जिल्ह्यात मराठवाडा व पश्चिम विदर्भासारखी समस्या नाही. तरी ट्रान्सफार्मर फेल होत असल्याची समस्या निर्माण होत आहे. दुसरीकडे एचव्हीडीएस कनेक्शन घेणारे शेतकरी जास्त त्रस्त आहेत. या योजनेंतर्गत १६ केव्हीचा एक ट्रान्सफार्मरवर जास्तीत जास्त दोन कृषी पंप कनेक्शन देण्यात आले आहे. परंतु हे ट्रान्सफार्मर फेल झाल्यावर ते दुरुस्त करण्यात अडचणी येत आहेत.
१४ एजन्सींकडे आहे दुरुस्तीचे काम
नाागपूर जिल्ह्यात एचव्हीडीएस कनेक्शनची संख्या २६०० इतकी आहे. योजनेंतर्गत लावण्यात आलेले ट्रान्सफार्मर खराब झाल्यास, किंवा जळाल्यास मोठे संकट निर्माण होते. असे ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्याची जबाबदारी १४ एजन्सींकडे सोपवण्यात आली आहे. जर ट्रान्सफार्मर शेतावरच दुरुस्त झाला नाही तर त्याला ठिक करण्यासाठी १५ दिवस लागतात. या कालावधीत शेतकरी आपल्या शेतात सिंचन करून शकत नाही.
अखंडित पुरवठ्याचा प्रयत्न
जिल्ह्यात कृषीपंपांना वीज कनेक्शन देण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये कुठलीही समस्या नाही. दूरवरच्या भागात लागलेल्या पारंपारिक वीज कनेक्शनमध्ये त्रुटी आल्यास त्याला दोन दिवसात ठिक केले जाते.
नारायण अमझरे, अधीक्षक अभियंता, महावितरण