लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आईचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याने अवघे दोन दिवसांचे नवजात पिलू अनाथ झाले. मात्र ‘ट्रान्झिट ट्रीटमेन्ट सेंटर’मधील चमूने त्याचे अश्रू पुसले. या दोन दिवसांच्या पिलाचे आता येथे संगोपन सुरू आहे.गोरेवाड्याजवळील येरला या गावालगत चार दिवसापूर्वी हृदय हेलावून टाकणारी ही घटना घडली. दुपारच्या वेळी एक माकडीण आपल्या दोन दिवसाच्या नवजात पिलाला घेऊन फिरत असताना विजेच्या खांबावर चढली. यात विजेचा ‘शॉक’ लागून मृत झाली. तिच्यासोबत असलेले पिलूही थोडे भाजले होते. नागरिकांना ही बाब कळताच त्यांनी ‘ट्रान्झिट ट्रीटमेन्ट सेंटर’मध्ये फोनवरून माहिती दिली. येथील चमूने जाऊन पाहिले असता माकडीण ‘इलेक्ट्रिक’ खांबाजवळ मृतावस्थेत पडलेली होती. तर नुकतेच जन्मलेले तिचे पिलू तिला बिलगून जोरजोरात ओरडत होते. या टीमने तिचे मृत शरीर ताब्यात घेतले व पिलाला केंद्रात आणले.त्या पिलाची नुकतीच नाळ पडली होती. त्याचा जन्म होऊन एक-दोन दिवस झाले असावेत. आईसोबत तेसुद्धा थोडे भाजले होते. त्याच्यावर उपचार सुरू केले. त्यालाही चांगलाच शॉक लागला होता. त्याला जगविणे हे येथील चमूपुढे आव्हान होते. सुरुवातीचे दोन-तीन दिवस कठीण गेले. मात्र आता त्याच्यात बरीच सुधारणा झाली आहे. मागील १५ दिवसांपूर्वी आईपासून विभक्त झालेले माकडाचे आणखी एक पिलू येथे आहे. त्याच्यासोबत आता या पिलाची चांगली गट्टी जमत आहे.लहान मुलं कुणाचीही असोत, त्याला फार सांभाळावे लागते. केव्हा काय होईल सांगता येत नाही. दोन अनाथ पिले आमच्याकडे आहेत. या पिलाला आणले तेव्हाचा प्रसंग फार हळवा होता. आता ते धक्क्यातून सावरत आहे.कुंदन हाते, मानद वन्यजीव रक्षक, ट्रान्झिट ट्रीटमेन्ट सेन्टर
ट्रान्झिट सेन्टरने पुसले माकडाच्या पिलाचे अश्रू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 9:24 PM
आईचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याने अवघे दोन दिवसांचे नवजात पिलू अनाथ झाले. मात्र ‘ट्रान्झिट ट्रीटमेन्ट सेंटर’मधील चमूने त्याचे अश्रू पुसले. या दोन दिवसांच्या पिलाचे आता येथे संगोपन सुरू आहे.
ठळक मुद्देआईचा शॉक लागून मृत्यू : पिलाचे सुरू आहे संगोपन