निशांत वानखेडे
नागपूर : जखमी प्राण्यांवर उपचार करून त्यांना सुखरुप निसर्गमुक्त करण्यासाठी नागपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला राज्य आणि देशपातळीवर सर्वमान्यता मिळत आहे. नागपूरप्रमाणे आता राज्यातील ११ जिल्ह्यात ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर उभारण्याचा आराखडा आखण्यात आला आहे. वन विभागाने हा प्लॅन तयार केला आहे. त्याला राज्य शासनाकडून अंतिम मंजुरीची प्रतीक्षा असून पुढच्या वर्षीपर्यंत सर्व सेंटर कार्यान्वित हाेण्याचा विश्वास वन विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
नागपूरचे ट्रान्झिट सेंटर हे देशातील पहिले वन्यप्राणी वेदना शमन केंद्र म्हणून ओळखले जाते. नागपूरप्रमाणे इतरही राज्यात प्राण्यांसाठी ट्रान्झिट सेंटर उभारण्याचे नियाेजन केले जात आहे. नुकताच मध्य प्रदेश वनविभागाच्या टीमने सेंटरचा अभ्यासदाैरा केला. विशेष म्हणजे अमरावती, यवतमाळ, नाशिक, नांदेड, मुंबई, पुणे आदी जिल्ह्यातून अशाप्रकारे ट्रान्झिट सेंटर निर्मितीची मागणी केली हाेती. त्यानुसार राज्यभरात ११ सर्कलमध्ये ११ ठिकाणी ट्रान्झिट सेंटर तयार करण्याचा प्लॅन तयार करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या नेतृत्वात समिती तयार करण्यात आली. यामध्ये मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांचा समावेश हाेता. वनविभागासाठी नि:शुल्क सेवा देत आर्किटेक्ट वैष्णवी खाेंडे यांनी सर्व ११ सेंटरचे डिझाईन तयार केले. वन विभागाने डिझाईन मंजूर करून महाराष्ट्र शासनाला पाठविले आहे. राज्याचा वने व पर्यावरण मंत्रालय या याेजनेसाठी सकारात्मक असून लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे समजते.
७.७ काेटी रुपये सुरक्षित
सूत्राच्या माहितीनुसार ट्रान्झिट सेंटरसाठी प्रत्येकी ७० लाख याप्रमाणे ७.७ काेटी रुपये निर्धारीत करण्यात आले आहेत. हे काम तीन टप्प्यात हाेणार आहे. राज्याच्या पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात यात आणखी भर पडणार असल्याची माहिती आहे.