लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर/हिंगणा/उमरेड/सावनेर/कामठी/काटाेल : नागपूर जिल्ह्यात रविवारी (दि. १६) प्राप्त झालेल्या काेराेना चाचणी अहवालांपैकी १,१३३ नागरिकांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. या पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये नागपूर शहरातील ७२६ तर ग्रामीण भागातील ३९६ रुग्णांचा समावेश आहे. उर्वरित १० रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. कळमेश्वर तालुक्यात एकूण ८२ नवीन रुग्ण आढळून आले असून, हिंगणा तालुक्यात ५१, उमरेड व सावनेर तालुक्यात प्रत्येकी १४, कामठी तालुक्यात ११ तर काटाेल तालुक्यात आठ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली.
कळमेश्वर तालुक्यात रविवारी ८२ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील ५७ तर ग्रामीण भागातील २५ रुग्णांचा समावेश आहे. हिंगणा तालुक्यातील ८४ नागरिकांच्या चाचणीचे अहवाल प्राप्त झाले असून, यातील ५१ जणांना काेराेनाची लागण झाल्याचे आढळून आले. या नवीन रुग्णांमध्ये वानाडोंगरी शहरातील २२ रुग्णांसह डिगडोह येथील सहा, रायपूर व हिंगणा येथील प्रत्येकी चार, नीलडोह येथील तीन, खैरी (मोरे), पिंपरी व जुनेवाणी येथील प्रत्येकी दाेन आणि इसासनी, शिरूळ, टाकळघाट, वडधामणा, मोहगाव व मेटाउमरी येथील प्रथेकी एका रुग्णाचा समावेश आहे. या नवीन रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ११,३५७ झाली असून, यातील १०,०५४ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे.