राहुल गांधींच्या 'भारत जोडो' पदयात्रेवरील 'तो निघालाय....' या  कवितेचे १३ भाषांमध्ये भाषांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 05:56 PM2022-11-16T17:56:54+5:302022-11-16T18:06:17+5:30

Nagpur News राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर लिहिलेली एक कविता सध्या देशविदेशात गाजत आहे.

Translation of Rahul Gandhi's poem 'To Challay...' on his 'Bharat Jodo' walk in 13 languages | राहुल गांधींच्या 'भारत जोडो' पदयात्रेवरील 'तो निघालाय....' या  कवितेचे १३ भाषांमध्ये भाषांतर

राहुल गांधींच्या 'भारत जोडो' पदयात्रेवरील 'तो निघालाय....' या  कवितेचे १३ भाषांमध्ये भाषांतर

googlenewsNext
ठळक मुद्देसॅम पित्रोदा यांनीही घेतली दखल हेरंबकुलकर्णी यांची कविता गाजतेय देशविदेशात

नागपूरः कन्याकुमारी ते काश्मीर असा पल्ला गाठणाऱ्या, जनसामान्यांच्या प्रश्नांची माहिती घेत निघालेल्या, तळागाळातील नागरिकांना भेटून त्यांच्याशी संवाद करत चाललेल्या भारत जोडो यात्रेचे तसेच या यात्रेचे जनक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करणारी एक कविता सध्या राज्यभरातच नव्हे तर राज्य तसेच देशाबाहेरही चर्चेत आहे. या कवितेचे आतापर्यंत ११ भारतीय  भाषांमध्ये व २ विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी ही कविता लिहिली आहे. या कवितेचे ज्या भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले त्यात, अरबी भाषेत नौशाद अलदे (सौदी अरेबिया), स्वाती वैद्य-हिंदी, संजय सोनवणी-इंग्रजी, मिलिंद पाटील-कन्नड, पुजा पुरोहित-गुजराती, विनानंद गावंडे-चंदगडी मराठी, एकनाथ गोफणे-बंजारा गोरबोली, सतीश ललित- मालवणी, नितीन खंडाळे-अहिराणी, अरविंद शिंगाडे-वऱ्हाडी, काकासाहेब वाळूंजकर-नगरीबोली यांचा समावेश आहे.

सॅम पित्रोडा यांनी घेतली दखल

जेष्ठ दूरसंचार अभियंते, संशोधक, विकासकांचे मार्गदर्शक व ज्येष्ठ सल्लागार सत्यनारायण गंगाराम पित्रोडा उर्फ सॅम पित्रोडा यांनी ट्विटरवर या कवितेची दखल घेतली आहे. आपल्या ट्विटमध्ये  त्यांनी राहुल गांधींवर लिहिलेल्या उपरोक्त कवितेचा व्हिडिओ शेअर केला आहे.  

हेरंब कुलकर्णी यांची कविता-

 

तो निघालाय

तो निघालाय
दक्षिणेकडून उत्तरेकडे
उत्तर नसलेल्या प्रश्नांना स्पर्श करत 
विमान,जेट,हेलिकॉप्टर,बुलेटप्रूफ गाड्या,सारे हाताशी असतानाही
 धुळीच्या रस्त्यावरून  तो निघालाय....

गर्दीचा गैरफायदा घेत
बापाच्या चिंधड्या झालेल्या प्रदेशातून 
पुन्हा त्याच गर्दीवर विश्वास टाकत
 हिंसेलाही लज्जित करत तो निघालाय..

पूर्वीही असेच राजे निघत
 अश्वमेध करायला, सैन्य घेऊन
जिंकत जिंकत
रक्ताचा सडा शिंपडत---
पण तो नि:शस्त्र आहे
प्रेम आणि संवादाचे शस्त्र घेऊन 

राज्य जिंकण्याचे सोडाच
  निवडणूक जिंकण्याचीही गोष्ट तो बोलत नाही
पक्षाच्या सीमा ओलांडून समविचारींना कवेत घेत तो निघालाय

फक्त येईल त्याला प्रेमाने आलिंगन देत,
एकट्या पडलेल्या 
व्यवस्थेत हरलेल्या
 फाटक्या
केविलवाण्या माणसांना 
मायेची ऊब देत तो निघालाय...

त्याच्या वयाला न शोभणारा ,
घरातला प्रेमळ ज्येष्ठ माणूस
 आबालवृद्धांना त्याच्यात भेटतोय
कुणाला भाऊ,कुणाला बाप, 
कुणाला लेक अशा नात्यात हा पन्नाशीचा पोरगा लुभावतोय....
त्याला भेटून रडताहेत माणसं 
त्यांच्या अश्रूत वाहताहेत,
 व्यवस्थेने त्यांच्यावर केलेले शोषणाचे घाव

नुसते चालून  होईल काय ? 
लोकांशी बोलून होईल काय ?
हा दांडी यात्रेपासून 
भूदान यात्रेपर्यंत 
आणि चंद्रशेखर ते बाबा आमटेपर्यंत 
खिल्ली उडवणारा 
ऐतिहासिक प्रश्न त्यालाही विचारला जाईल...
पण
असल्या प्रश्नांची उत्तरे वर्तमान
नाही
तर
इतिहासच देत असतो...
 

 

Web Title: Translation of Rahul Gandhi's poem 'To Challay...' on his 'Bharat Jodo' walk in 13 languages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.